सत्याग्रही विचारधारा

जनशक्ती, धनशक्ती, न्यायशक्ती
आणि 
राजशक्ती, प्रचारशक्ती यांचा खेळ
संपादकीय: जानेवारी २०१२ 

गल्लीबोळात मुले क्रिकेटचा खेळ खेळतात. तिथून टप्प्या टप्प्याने कि‘केटपटू तयार होतात. शेवटी राष्ट्रीय टीम तयार होते. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका यांच्या  निवडणुकांमध्ये छोट्या मोठ्या राजकीय टीममध्ये स्पर्धा होतात. अखेरीस विधानसभा, लोकसभा, निवडणुकांत सशक्त टीम विजयी होते. मग तो राजकीय पक्ष राज्यात वा देशात राज्य करतो. महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमधून जनमानसाची दिशा व्यक्त झाली. विशेषतः आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षाची विजयी होण्याकडे वाटचाल चालू आहे याचा अंदाज आला. निवडणुकीच्या निकालांकडे नजर टाकली तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा बोलबाला वाढला आहे असे लक्षात येते. जवळपास त्यांच्या बरोबरीनेच अ. भा.  कॉंग्रेस  पक्षानेही यश प्राप्त केले आहे. याचा अर्थ असा आहे की, महाराष्ट्रात विधानसभेच्या आगामी निवडणुकीत या दोन्ही पक्षांची राजकीय आघाडी होणार हे आत्ताच नक्की झाले. राजकारणात भांडणे, मतभिन्नता, एकमेकांवर कुरघोडया या गोष्टी सतत चालू असतात. राजकारण हे हितसंबंधाच्या टकरावांचे आणि समझोत्याचे  रणांगण आहे. त्यात जनेतचा पाठिंबा नावाची बाब अत्यंत महत्वाची असते. राष्ट्रवादी  कॉंग्रेस   व अ. भा.  कॉंग्रेस  हे दोन्ही पक्ष एकत्र आले तरच दोघांना महाराष्ट्राच्या सत्तेत वाटा मिळू शकतो. हे पुन्हा सिध्द झाले. राजकीय युती केली नाही तर या दोन्ही पक्षांना सत्तेपासून वंचित रहावे लागेल. 
भाजप, शिवसेना, व रिपब्लिकन हे पक्ष एकत्र आले आहेत. या तीन पक्षांची राजकीय आघाडी तयार झाली आहे. परंतु या निवडणुकीत तिचा प्रभाव वाढण्यापेक्षा उलट मंदावलेला दिसतो. अजून तरी जनतेने ही महाआघाडी स्वीकारलेली दिसत नाही. कदाचित या महाआघाडीचा प्रभाव मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत दिसेल. या आघाडीतील तिन्ही पक्षांची तोंडे तीन भिन्न दिशेला आहेत. बेळगावमध्ये मराठी माणूस विरूध्द कर्नाटकचे राज्यसरकार असा संघर्ष चालू आहे. कर्नाटक सरकारने नुकतीच मराठी लोकांच्या ताब्यात असलेली बेळगावची महानगरपालिका बरखास्त केली. कर्नाटकात भाजपचे सरकार आहे. महाराष्ट्रातील भाजप त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचा विरोध पत्करून कर्नाटक सरकारच्या विरोधात संघर्षात उतरणार नाही. याउलट शिवसेना हा फक्त मराठी माणसापुरता मर्यादित बांधिलकी मानणारा एक प्रादेशिक पक्ष आहे. म्हणून शिवसेनेची कन्नड राज्यशाखा नाही. त्यामुळे शिवसेना मराठी माणसाचा कैवार घेऊन कन्नड भाषिकांचा द्वेष बिनाधास्त वाढवू शकते. तसेच कन्नड भाषिकांबरोबर महाराष्ट्रात म्हणजे ‘अपने गलीमें’ दोन हात करू शकते. 
महाआघाडीतल्या तीनही पक्षांमध्ये आत अन बाहेर संघर्ष चालू आहे. अशा परिस्थितीत तिघांनाही एकमेकांचा सहारा हवा आहे. भाजपमध्ये नितीन गडकरी व गोपीनाथ मुंडे यांचे अनुयायी सतत एकमेकांवर कुरघोडी करीत असतात. गोपीनाथ मुंढे यांचे स्वतःचे घरच फुटले आहे. खुद्द परळीत त्याचा पुतण्या धनंजय  मुंढे  काकाच्या विरोधात दंड थोपटून उभा आहे. शिवसेनेतही पुतण्या काकांच्या विरोधात उभा राहिला. या ‘पुतण्या रोगा’च्या साथीची लागण सर्व पक्षांना होऊ शकते. ती त्रासदायक ठरणार आहे. त्या तुलनेत शरद पवार आणि अजितदादा पवार ही काका-पुतण्याची राजकीय जोडी अजून अभेद्य आहे. शिवसेनेचे सामर्थ्य राज ठाकरे यांच्या मनसेने काही प्रमाणात घटविले आहे. रिपब्लिकन पक्षात एवढे गट आहेत की त्यांच्यात ऐक्य अशक्य आहे. त्यांचे सामर्थ्य कधीच वाढणार नाही कारण तो पक्ष एकजातीय असल्याने जातीची मर्यादा तो पक्ष कशी ओलांडणार? जात  संख्येने वाढत नसते. भारतीय नागरिक  संख्येने वाढू शकतात. रिपब्लिक पक्ष फक्त घटू शकतो. रामदास आठवले आपल्या गटाचे अस्तित्व टिकवून धरण्यासाठी शिवसेनेबरोबर सहकार्य करीत आहेत.
नगरपालिका निवडणुकीच्या निकालांवरून हे सिध्द झाले की, किरकोळ अपवाद वगळता प्रस्थापितांनी आपले बालेकिल्ले शाबूत ठेवले आहेत. गावोगाव शेकडो वर्षांपासून पाटील घराणी जनतेवर नियंत्रण गाजवीत आले आहेत. त्यांची पारंपरिक दहशत आधुनिक लोकशाही भारतातही पूर्वापार तशीच चालू आहे. गावाचा प्रतिनिधी कोण असावा हे गावातील मतदार ठरवीत नाहीत, तर गावचा पाटील ठरवितो. हे लोकशाही प्रणालीला छेद देणारे आहे. प्रादेशिक पातळीवरचा पक्ष गावोगावच्या पाटलांना नेहमीच सोईचा वाटतो. वारंवार दिल्लीला जायचे, तिथे पक्षातील गॉडफादर शोधायचे, त्यांना नैवेद्य देऊन खुश राखायचे हे काम त्यांना अवघड वाटते. मुंबईला पोचणे त्यांना सोपे वाटते. प्रादेशिक पक्षाला आंतरराष्ट्रीय प्रश्न, राष्ट्रीय समस्या, नियोजन इत्यादी बाबींवर डोके वापरायची आवश्यकताच वाटत नसते. प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांची अपूर्णता व त्यांची राजकीय शैली गावोगावच्या पाटलांना आकर्षित करते. राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षाला तत्वज्ञानाची बैठक नसल्याने त्यांना राजकीय तडजोडी करणे खूप सोपे जाते. म्हणूनच राष्ट्रवादी  कॉंग्रेस  हा पक्ष गावोगावच्या पाटलांना सोयीचा वाटू लागलाय. या पक्षाच्या नेत्यांना मुजरा केला की गावातील लोकांना दाबण्याचे लायसेन्स मिळते. हळूहळू राष्ट्रवादी  कॉंग्रेस  पक्ष ‘पाटलांचा महासंघ’ बनला आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका यांच्या पातळीपर्यंत पारंपारिक पाटीलशाहीचा प्रभाव आढळतो. गावापासून दूर गेल्यावर मात्र हा प्रभाव संपतो. कारण एका पाटलाचा दुसर्‍या गावावर प्रभाव नसतो. राष्ट्रवादी कॉंग्रेसमुळे फक्त स्थानिक प्रभावांची बेरीज होण्याची सोय झाली. तथापि आगामी विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या वेळी या पक्षाच्या प्रभावात घट होणार हे नक्की! 

या निवडणुकीत कोकणात मात्र वेगळे घडले. नारायण राणे यांना निष्प्रभ करण्यासाठी त्यांचे सारे विरोधक एकत्र आले. सध्या त्या एकजुटीच्या कपाळावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कुंकू  लावण्यात आले आहे. तिथे राष्ट्रवादी  कॉंग्रेसला नाममात्र कुंकवाचा धनी करण्याचे कारण एकच! महाराष्ट्राचे गृहमंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत.  राणे विरोधकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करताना पोलीस यंत्रणा पाठीशी रहावी हा हेतू मनात बाळगलेला दिसतो.

नारायण राणेचे व्यक्तिमत्व मूलतः राजकीय रसायनामधून तयार झालेले नाही. ते जिथे जातील, तिथे ते टोळी जमवणार, हा त्यांचा स्वभाव आहे. शिवसेनेत आक्रमकता, गुंडगिरी, राडेबाजी या गुणांना वाव मिळतो, प्रतिष्ठा लाभते. त्यामुळे राणेंचे शिवसेनेत खूपच कौतुक झाले. सेनाप्रमुखांना निष्ठा वाहण्यात त्यांनी कसूर केली नाही. म्हणून त्यांची  आक्रमकता  सेनेत प्रशंसनीय ठरली. निष्ठेत व्यभिचार केल्यानंतर सेनेत त्यांचे कौतुक संपले. मग ते कॉंग्रेसमध्ये गेले, त्यांचे मन मात्र गतकाळातच राहिले. तिथे त्यांच्या आक्रमकतेला दाद मिळाली नाही. उलट पूर्वी त्यांनी ज्यांना पीडा दिली, ज्यांच्यावर अन्याय केला ते सारे आता एकत्र आले आहेत. कुठलीही पिडा कधीतरी उलट दिशेने फिरून मूळ पिडा देणार्‍यावर आघात करीत असतेच. राणेंच्या जवळ आज त्यांचे जेवढे निष्ठावंत उरले आहेत, त्यापेक्षा जास्त सं‘येने त्यांनी पूर्वी स्वतःच्या वर्तनाने तयार केलेले विरोधक त्यांच्याभोवती फेर धरू लागले आहेत. पोलीसखाते अनुकूल असल्याशिवाय राणेंसारखे पुढारी टिकू शकत नाहीत. यावेळी पोलीसयंत्रणा त्यांच्या बाजुला झुकू नये म्हणून विरोधकांनी ज्या पक्षाकडे गृहमंत्री आहेत त्या पक्षाची कास धरली आहे. या सर्व घटनांमध्ये कोकणात शिवसेना व कॉंग्रेसचा धुव्वा उडाला आणि मतदार राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे वळले असे म्हणणे वस्तुस्थितीला सोडून होईल. नारायण राणे आणि त्यांचे खासदार पुत्र यांची भाषा, काम करण्याची शैली सारे काही लोकशाहीला शोभादायक नाही. राणे नावाचा एक तळपणारा व तापदायक कोकणी सूर्य आता मावळतीच्या दिशेला झुकू लागला आहे हे मात्र खरे. आक‘मक व्यक्तीच्या भोवती आश्रयाकांक्षी व विरोधक असे दोन जमाव तयार होतात. लोकशाही प्रणालीत आक‘मकतेला स्थान नाही. पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशावर आणीबाणी लादून वैयक्तिक आक्रमकतेचा परिचय दिला होता. त्या काळात त्यांच्याभोवती लाचारांचा मेळा तयार झाला होता. त्यांचे राजकारण उदध्वस्त करण्यासाठी दुर्बळ माणसे मतभेद बाजुला ठेवून एकत्र आली आहेत. हा इतिहास राजकारणातल्या कुणी विसरू नये.

लोकपाल बिलाची कहाणीः
लोकपाल बिलाच्या निमित्ताने एक स्वागातार्ह गोष्ट घडली. देशातील सामान्य नागरिकांनाही ‘बिल’ व ‘कायदा’ यातील फरक व दोन्हीमधले अंतर कसे पार केले जाते ही प्रकि‘या उमगत चालली आहे. संसदेत बिल कसे प्रवेश करते, ते सभागृहाची मालमत्ता कसे बनते आणि सभागृहातील सदस्यांच्या हाती त्या बिलाचे भवितव्य कसे संक्रमित होते या प्रक्रियेबद्दल लोकांना ज्ञान झाले. यावर झालेल्या व होत असलेल्या व्यापक चर्चेमुळे भारतीय नागरिकांच्या सामुदायिक शहाणपणात निश्चित भर पडली आहे. याचे अर्धे श्रेय अण्णा हजारे यांना दिले पाहिजे. कारण ते अडाणीपणाने काहीतरी उत्स्फूर्तपणे बोलून बसतात. ते त्यांना माहीत नसलेल्या विषयावर ते रेटून बोलतात. अज्ञानातून साहस जन्माला येत असते. प्रसारमाध्यमे कसल्याही विषयावर अण्णांचे मत ऐकायला फारच उत्सुक असतात. मग त्यांच्या या वक्तव्यावर वाहिन्यांवर उलट सुलट चर्चा होते. या चर्चा आज ग्रामीण  भागातील तरुणांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. तरूणांना चर्चेची सवय लागणे हे लोकशाहीला पोषकच ठरणार आहे. रोज रात्री 9 वाजता ग्रामीण भागातील लोक आणि विशेषताः तरुण मंडळी टीव्ही समोर मांडी ठोकून बसलेले असतात.
सत्याग्रहीच्या वाचकांच्या हे लक्षात आले असेलच की आम्ही अण्णा हजारे यांच्या लोकपाल बिलासंदर्भात सुरू झालेल्या जनआंदोलनापासून प्रथमपासून फटकून राहिलो. वेगळा सूर लावला. हळूहळू आमचा विरोधी सूर मोठा होत गेला. याची काही गंभीर कारणे आहेत. ती सत्याग‘हीच्या वाचकांना सांगणे आवश्यक आहे. सत्य जाणून घेणे हा सत्याग्रही वाचकांचा हक्कच आहे.

1.  आंदोलनाबाबत संशयः
आमच्या मनात प्रथमपासून एक संशय होता. तो अण्णांच्या आंदोलनाच्या एकेका दिवसानंतर अधिक बळकट होत गेला. भारताची राज्यघटना ही कार्यकारी विभाग, कायदे मंडळ आणि न्यायसंस्था या तीन वेगवेगळया स्वायत्त खांबांवर उभी आहे. यामागे एक कल्पना आहे. जर एका घटकामध्ये घसरण झाली, तर दुसरा विभाग परिस्थितीला लगाम घालून देशाला सावरू शकतो. राज्यघटनेतील या व्यवस्थेमुळे स्वातंत्र्य मिळून 67 वर्षे झाली, तरी देशात हुकूमशाहीचा उदय झाला नाही.
1975 साली पं. इंदिरा गांधींनी घटनात्मक चौकटीत राहून देशावर आणीबाणी लादली. लोकशाहीचा एक खांब - कार्यकारी विभाग - उर्वरित दोन खांबांना तुच्छ लेखू लागला. त्यावेळी त्यांनी  भारतीय नागरिकांची मूलभूत स्वातंत्र्ये नष्ट केली होती. तरीही आंतरिक शक्तीच्या आधारे 1977 च्या निवडणुकीत देशाने इंदिरा गांधींना पराभूत केले. कोन्ग्रेस पक्षाची सत्तेवरून हकालपट्टी केली. लोकशाहीची पुनर्स्थापना केली. भारतीय राज्यघटनेने संकटकाळी आपले अंतर्भूत सामर्थ्य आणि तेज दाखविले. त्या संकटात लोकशाही प्रणाली एका अग्निदिव्यातून बाहेर पडली. हा ऐतिहासिक अनुभव गाठीशी असूनही प्रस्थापित राज्यघटना बदलून टीम अण्णाची अध्यक्षीय प्रणाली लागू करायची पूर्वतयारी चालू आहे की काय, अशी आम्हाला शंका येऊ लागली.

2. संसदेला गौणत्वः
जनलोकपाल बिल आणि त्यासाठी जनआंदोलन नामक बाजारू प्रदर्शन ही अध्यक्षीय लोकशाहीची रंगीत तालीम आहे असा संशय आम्हाला येऊ लागला. त्याला कारण होते. अमेरिकेच्या अध्यक्षाला तेथील सिनेटपेक्षा (संसदेपेक्षा) अधिक अधिकार आहेत.  तेथील संसदेने बहुमताने एखादा ठराव संमत केला तरी त्या ठरावाच्या विरोधात अध्यक्षाला निर्णय घेता येतो. अमेरिकेच्या अध्यक्षावर निवडून आलेल्या सिनेटर्समधूनच काहींना मंत्रिमंडळात सदस्य म्हणून घेण्याचे बंधन नसते. त्याच्या मर्जीनुसार कोणत्याही व्यक्तीला तो मंत्रिमंडळात घेऊ शकतो. याचा अर्थ सार्वजनिक जीवनाचा स्पर्श नसलेली मंडळी अमेरिकेच्या जनतेवर राज्य करू शकतात.
भारतीय लोकशाहीत निवडून आलेले लोकप्रतिनिधी मामुली आहेत असा तुच्छतादर्शक भाव काही विचारवंत मंडळींमध्ये आढळतो. ते स्वतःला सर्वज्ञानी, एक्सपर्ट समजतात. वास्तवात ते पढतमूर्ख असण्याची शक्यता असते. प्रशांत भूषण, शांती भूषण, संतोष हेगडे, किरण बेदी, अरविंद केजरीवाल या टाईपची माणसे स्वतःला खासदारांपेक्षा, केंद्रिय मंत्र्यांपेक्षा, पंतप्रधानांपेक्षा किंवा निवडून आलेल्या कुणाही व्यक्तीपेक्षा अधिक विद्वान समजतात. तसेच देशावर राज्य करायला केवळ तेच मुठभर लोक लायक आहेत असा गैरसमज ते जनतेत पसरवितात. एवढेच नव्हे; तर ते स्वतःला सार्वजनिक चारित्र्याचे व नैतिकतेचे शिरोमनी समजतात. ही मंडळी इतरांवर ‘नैतिक पोलीस’ म्हणून दंडूकेशाही करू इच्छितात. त्यांच्या व्यक्तिमत्वात सत्ताकांक्षा किती आणि नैतिकतेचा अंश किती असतो याबद्दल आमच्या मनात शंका होती. ती शंका रास्त आहे हे या मंडळींनी आपल्या आचाराने व विचाराने वारंवार सिध्द केले. अण्णा व त्यांची टीम ही मंडळी विद्वान किती, चारित्र्यवान किती आणि ते नैतिकतेचे कितपत पालन करणारी आहे? ते स्वतःला सर्वांपेक्षा ते उच्च स्तरावरील पवित्र लोक मानतात? ते खरोखर तसे आहेत की नाहीत हे शंकास्पद आहे. अण्णा व त्यांचा संच यांचा नेहमीच ‘आपण उच्च नैतिक स्तरावर जगणारे स्पेशल लोक आहोत’ असे शिफारसपत्र स्वतःला घेण्याचा पवित्रा असतो. यालाच ‘ब्राह्मण्य’ असे म्हणतात. जन्माने  ब्राह्मण नसलेल्या व्यक्तीमध्ये देखील ‘ ब्राह्मण्य’ ठासून भरलेले असू शकते, हे अजून भारतीय नागरिकांना उमगलेले नाही. हा  ब्राह्मण्याचा दोष अण्णांमध्ये जन्मामुळे नव्हे; तर त्यांच्या पायामधून डोक्यात शिरलेला आहे. जेव्हा लोक आपल्या पाया पडतात, तेव्हा आपण देव आहोत असा भ्रम पाया पडून घेणार्‍याच्या बुध्दीत शिरतो. तसे होणे स्वाभाविक आहे. दुसर्‍याने आपल्या पायावर माथा टेकवावा ही इच्छा हा सत्ताकांक्षेचाच अविभाज्य भाग आहे. हा मानसिक रोग आहे. तो वाढत जातो.  मग देशाच्या संसदेने आपल्या पायावर डोके टेकवावे, आपण संसदेचे बाप आहोत, देशाने राज्यघटना आपल्या पायावर अर्पण करावी असेही वाटू लागते. भोवती सतत कॅमेरे असतील तर कशाचाही विधीनिषेध राहत नाही. कॅमेर्‍यांची संख्या कमी झाली की अधिक विवादास्पद बोलावे, म्हणजे कॅमेरेवाले धावत येतील हे कळते. मग माणूस काहीबाही बोलून कॅमेरे आकर्षित करू लागतो. सामान्य माणसांना चॅनेल्समधून ज्या प्रतिमा त्यांच्यावर आदळतात तेच वास्तव वाटू लागते. अण्णा - टीमची दर्पोक्ती ऐकली की आमच्या मनात प्रश्न उभा राहिला. टीम-अण्णाच्या मनात अण्णा हजारे यांच्या विषयी तुच्छतेची भावना असावी. गर्विष्ठ अन आत्मकेंद्री विचारवंत हे लोकशाहीला मोठा धोका असतात. अण्णा हजारे यांचा वापर करण्यात फक्त त्यांची सोय होते. त्यांच्या मोठेपणासाठी देशाला वेठीस धरणे अनैतिक आहे असे त्यांना वाटत नाही. अण्णा हजारे स्वतःला जेष्ठ व श्रेष्ठ मानू लागले. स्वतःचे भलतेच मूल्यमापन करू लागले. त्यामुळेच ते या विद्वान मंडळींच्या गळाला लागले. अहंकारामुळे विवेकबुध्दी नष्ट होते. जणू अण्णा भारताचे राष्ट्राध्यक्ष बनणार आणि ते टीम अण्णातील प्रत्येक सदस्याला केंद्रिय मंत्रिमंडळात घेणार असा भ्रम निर्माण झाला. त्याचबरोबर आपण भारताला महासत्ता बनविणार व जगात देशाला भ्रष्टाचारमुक्त, नैतिकतेच्या सुर्याने तळपणारे एक बलाढय राष्ट्र बनविणार अशी अण्णांच्या मनात चुकीची धारणा झाली.
cover page 

3.  टीम-अण्णा मालक व संसद गुलामः
अण्णा व त्यांच्या टीमची वाणी व करणी दिवसेंदिवस आक्रमक व तर्कहीन बनू लागली. आकाशातून देव बोलतात, त्या थाटात अण्णा बोलू लागले. ‘जे मी म्हणतो तेच झाले पाहिजे. मी उपोषण करीन. प्राणांचा त्याग करीन. मी मेलो तर देश पेटून उठेल. जो मला विरोध करील त्याला वेड्याच्या इस्पितळात पाठविले पाहिजे. शरद पवारांना एकच थोबाडीत मारली...?  मी 120 कोटी जनतेच्या वतीने बोलत आहे. जनता (खरे म्हणजे मीच) संसदेची मालक आहे. संसदेने मालकाचे ऐकलेच पाहिजे. अमुक तारखेपर्यंत मी म्हणतो ते लोकपाल बिल संसदेत संमत झालेच पाहिजे. अशी हट्टाग्रही वक्तव्ये अण्णा वारंवार करू लागले. 
केंद्र सरकार आघाडीचे आहे, राजकीयदृष्ट्‌या ते दुर्बळ आहे. म्हणून या सरकारला संसदबाह्य मार्गाने हाकलून देता येईल असा मोह अण्णांना, त्यांच्या टीमला व संसदेमधील भाजप सारख्या विरोधी पक्षांना झाला आहे असे दिसू लागले. अण्णा आजपर्यंत किमान दहा हजारवेळा म्हणाले असतील की ‘‘मी स्वतः महाराष्ट्रातील सहा मंत्री खाल्ले आहेत’’. याचा अर्थ,  मनमोहनसिंग सरकार खाण्याइतकी माझी पचनशक्ती आहे. हा संदेश त्यांना द्यायचा होता. ही भाषा सत्याग्रही व्यक्तीला बिलकूल शोभत नाही. त्यांच्या या भाषेला फसून भाजपने त्यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार मानले आहे असे दिसते. 

4.  भाजप, व्यापारी व अण्णाः 
भाजप सातत्याने काहीतरी खुसपट काढून संसदेतून बाहेर निघून जातो. सतत सभात्याग करणे म्हणजे संसदेवर थुंकण्यासारखे आहे. संसदेविषयी इतकी तुच्छता यापूर्वी देशात कधीही दिसली नव्हती. ‘सत्तेवर आम्ही येवू  शकलो नाही, तर आम्ही संसदीय लोकशाहीचा डावच मोडून टाकू‘ असा पण भाजपने केलेला दिसतो. विरोधी पक्षाने सरकारच्या चुकीच्या धोरणांना अवश्य विरोध करावा, ते त्यांचे कर्तव्यच आहे; पण संसदेमधील कामकाजात सतत अडथळे आणणे हे त्यांना शोभत नाही. अण्णांचे आंदोलन, किरकोळ व्यापारात परकीय गुंतवणूक करायला झालेला बनियांचा जबर विरोध आणि भाजपने संसदेला तमाशा बनवून टाकणे या तिन्ही बाबींमध्ये काहीतरी आंतरिक धागा आहे असा आम्हाला रास्त संशय येऊ लागला.

भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाची तुतारी फुंकून हा योग्य विषय अण्णांनी हाती घेतला होता. त्यामुळे प्रारंभीच्या काळात आमचा त्यांच्या उद्दिष्टांना पाठिंबा होता. फक्त अणांच्या कार्यपध्दतीमध्ये सुधारणा झाली पाहिजे असे वाटत असे. ते मी वाहिन्यांवर जेव्हा संधी मिळेल तेव्हा बोलून दाखवत असे. उदा. ‘‘अण्णा, आपण सत्याग्रही आहोत. आपण कुणाशी वैरत्व राखू नये. आपल्या मनात क्रोध नसावा‘’ वगैरे गोष्टी बोललो. सत्याग्रही पध्दतीच्या जनआंदोलनात फक्त ‘प्रतिपक्षी’ असतो; वैरी कधीच नसतो हे सांगितले. सत्याग्रही जनआंदोलनात वैराला स्थान नाही ही आमची पक्की धारणा आहे. आयुष्यभर अनेक जनआंदोलने केल्यामुळे,  तो अनुभव गाठीशी असल्यामुळे कोणत्याही जनआंदोलनाच्या नेत्याच्या वाणी व कृतीमधून जे व्यक्त होते, त्यावरून ते सत्याग्रही आंदोलन यशस्वी होणार की नाही  याचा अंदाज आम्हाला येतो. अण्णा हजारे यांच्या आंदोलनात मला काही दोष दिसू लागले. म्हणून मी जाहीररीत्या, हळुवारपणे काही सूचना केल्या. कशाचाही उपयोग झाला नाही. अण्णांच्या डोक्यातील  भ्रमाचा फुगा हवेत उंच जाऊ लागला. अखेरीस आमची खात्री झाली की अण्णांना भ्रष्टाचार  मुक्तीसाठी लोकपाल नकोय, तर कॉंग्रेसविरोधी जनमत तयार करण्याकरिता लोकपाल हे निमित्त त्यांना वापरायचे आहे. कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरोधात काम करण्याचा प्रत्येकाला मुलभूत हक्क आहे. याबद्दल आमच्या मनात दुमत नाही. तथापि ताकाला जाऊन भांडे लपविण्याचा प्रकार सत्याग्रही चारित्र्यात बसत नाही. नंतर एकेक गोष्टी उलगडू लागल्या. 

अण्णा-टीम प्रत्येक वेळी सरकारविषयी द्वेष पसरविण्याच्या हेतूने बोलणी फिसकटवित आहेत, हे लक्षात आले. अण्णा कॉंग्रेस पक्षावर व त्यांच्या नेत्यांवर खालच्या पातळीवरील टीका करून आपली प्रतिष्ठा कमी करून घेऊ लागले. कधी पंतप्रधानांवर टीकेचा आसूड ओढ, तर राहुल गांधींना शिव्या दे, तर कधी सोनिया गांधींना दूषण दे असा प्रकार त्यांनी सुरू केला. अण्णांजवळ वैचारिक श्रीमंती नसल्याने थोड्याच वेळात त्यांचे विचार संपतात. मग ते पुररूक्ती करीत राहतात किंवा मूळ प्रकृती नुसार एकेरीवर उतरतात. हे मला फार पूर्वीपासून ठाऊक होते. वयोमानानुसार त्यांच्यामध्ये मानसिक शांती आली असेल असा माझा उगाचच समज होता. 
भाजप केवळ परिस्थितीचा लाभ उठवित आहे. अण्णा नावाचे अस्त्र कॉंग्रेसवर फेकणे एवढाच त्यांचा हेतू दिसतो. त्यांना अँटीकॉंग्रेसिझम नावाच्या तत्त्वज्ञानाचे आदर्श (आयकॉन) म्हणून अण्णांचा हुतात्मा करावयाचा आहे, त्यांनतर अण्णांची जागोजागी देवळे बांधायची आणि तिथून हिंदूराष्ट्राचा प्रसाद वाटायचा हा भाजपचा डावपेच लक्षात येऊ लागला. अण्णांमध्ये ग्रामीण शहाणपण ओतप्रोत भरले आहे. त्यामुळे ते भाजपच्या अखेरच्या डावाला कधीच बळी पडणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. तथापि पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये अण्णांचा कॉंग्रेस विरोधासाठी मुक्त वापर करायचा भाजपचा डाव यशस्वी होत आहे हे लक्षात आले. अण्णांचे दोन दोष भाजपने नेमके हेरले आहेत. अण्णांच्या मनाची कवाडे त्यांच्या पायावर डोके ठेवले तरच खुली होतात हा पहिला दोष. कॅमेरा पाहिला की अण्णा कितीही भडक विधान करू शकतात हा दुसरा दोष या दोन दोन दोषांवर भाजपचा खेळ उभा आहे. 

भाजपची श्रध्दा राज्यघटनेवर नसून ‘हिंदूराष्ट्र’ नावाच्या धर्माधिष्ठीत राष्ट्रावर आहे. ते संसदेचा उपयोग होत नसेल तर तिला कस्पटासमान मानतात. या दोन कारणांसाठी आम्ही भाजपच्या विरोधात आहोत. त्यांच्याबरोबर अण्णांनी हातमिळवणी केल्यामुळे त्यांना विरोध करण्याची इच्छा प्रबळ झाली.
कॉंग्रेसचे आम्ही देखील कट्टर विरोधक आहोत. ते भ्रष्टाचारी आहेत याबद्दल शंका नाही. तथापि कॉंग्रेस विरोधाच्या नावाखाली भ्रष्टाचाराचा लढा देताना अनाचार पवित्र बनत नसतो. पं. इंदिरा गांधी यांच्या राजवटीत 35-40 वेळा आम्ही कारावास भोगला. आणीबाणीत 3 महिने भूमिगत व 16 महिने येरवडा कारागृहात बंदिवासात राहिलो. महाराष्ट्र राज्याने गुन्हेगारांनी तयार केलेल्या मिसा कायद्याचा वापर मुख्यमंत्री वसंतराव नाईक सरकारने आमच्या विरोधात अनेकवेळा केला. मिसा कायद्यात अटक झाली की न्यायालयात दाद मागण्याची सोय नसे. दोषारोपपत्र न ठेवता एखादे भाषण केले की सरकार तुरूंगात टाकत असे. म्हणून कॉंग्रेस विषयी मनात यत्किंचितही प्रेम नाही. परंतु मुसलमानांचा संहार करणे, त्यांच्याकडून शरणनामे लिहून घेणे हा प्रकार भाजपच करू शकते. कॉंग्रेसमध्ये भ्रष्टाचार आहे, तर भाजपमध्ये अनाचार आहे. भ्रष्टाचाराला विरोध करताना आम्ही अनाचाराचे स्वागत करू शकत नाही. अण्णा हजारे यांनी गुजरातमध्ये नरेंद्र मोदींनी एवढा नंगानाच घातला तरी त्यांच्याविरोधात तेव्हा ‘ब्र‘’ शब्द काढला नव्हता याचे स्मरण झाले.
अण्णा हजारे यांचा ‘अण्णावाद’ नाविन्यपूर्ण आहे असे कुणी म्हटले तर ते आम्ही मान्य करू. तथापि अण्णा ते ‘प्रतिगांधी’ आहेत असे कुणी म्हटले तर आम्ही महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर वा फोटोसमोर जातो आणि म्हणतो की, ‘‘बापूजी क्षमा करा. स्वतःला ‘प्रतिगांधी’ म्हणविणारा एक माणूस तुमच्या विचारसरणीचे थिल्लरीकरण करीत आहे... आणि तो थोर माणूस माझा मित्र आहे. म्हणून बापूजी, मला क्षमा करा! मी अत्यंत प्रामाणिकपणाने माझ्या या मित्राला जाहीरपणे विनंती करणार आहे.’’ मी त्याला म्हणेन की, ‘बाबा रे, कृपया गांधींच्या विचारसरणीत दुरूस्त्या करू नकोस. गांधींच्या विचारांना  तसेच अडगळीत पडू दे. तू तुझ्या विचारांचा झेंडा फडकवित सिकंदर दि ग्रेट बन. आमची हरकत नाही. पण गांधीवादात दुरूस्त्या करून गांधींचे विचार मानणार्‍या लोकांच्या जीवनाची बैठक मोडून टाकू नकोस’.

अण्णांनी महात्मा बनायचा प्रयत्न केला, प्रतिगांधी बनायचा हट्ट केला. भारताचा स्वातंत्र्यलढा अण्णांपासूनच सुरू होतो असे ऐकवून ‘राष्ट्रपिता’ बनण्याचा प्रयत्न केला. संसदेला वाकविण्याचा प्रयत्न केला हे सारे आम्हाला असह्य झाले. तरी आम्ही म्हणतो की, ‘‘अण्णा, माझ्या थोरल्या भावा! अकारण उपवास करून जीव जाळू नकोस. कुसंगतीचा त्याग कर. शांत रहा, सुखी रहा, तुझे कल्याण होवो, तुझे मंगल होवो!’’

डॉ. कुमार सप्तर्षी
संपादक, सत्याग्रही विचारधारा