Thursday 17 October 2013

गो पु देशपांडे यांना श्रद्धांजली

प्रसिद्ध नाट्यकर्मी गो पु देशपांडे आणि माझे बहुतेक विचार जुळत. नक्षलवादी चळवळीतील हिंसाचार कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय नाही एवढाच आमचा चर्चेतला मतभेद. १९६८ साली मी डॉक्टर झालो. दिल्लीतील राजकारणाचा अनुभव घेण्यासाठी पुणे शहराचे खासदार एसेम जोशी यांच्या घरी राहत असे. त्याच गल्लीत आशिया खंडाचा आंतरराष्ट्रीय अभ्यास करणारी एक संस्था होती, त्यात गो पु संशोधनाचे कार्य करीत. प्रा. राम बापट यांचे ते मित्र. तसेच रहिमतपूर येथील डॉक्टर देशपांडे यांच्या निमंत्रणावरून मी तेथील व्याख्यानमालेला बोलण्यासाठी गेलो होतो. तेंव्हा गो पु देशपांडे  यांच्या घरी राहिलो होतो. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांची ओळख होती. एसेम दिल्लीत नसल्यावर मी गो पु यांच्या ऑफिस मध्ये जावून गप्पा मारत असे. त्यावेळा त्यांचा धाकटा भाऊ विकास देशपांडे हा त्याच्याबरोबरच होता. 

गो पु चीन या विषयावर तद्न्य होते. विचाराने ते कम्युनिस्ट होते. त्यांना चीनी भाषा येत होती. चीनची नियतकालिके वाचत. त्याच्याकडून मला चीन विषयी खूप माहिती मिळाली. पुढे ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठात चीनी भाषेचे प्राध्यापक म्हणून काम करू लागले. जेंव्हा मी दिल्लीत जात असे तेंवा मी आवर्जून त्यांच्या घरी जात असे. 

आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात ते मराठी नाट्यलेखन करू लागले. त्यांचे बालपण ग्रामीण भागात गेल्यामुळे त्यांची नाळ मातीशी जुळलेली होती. डाव्या विचाराचे फासिनेबल विचारवंत नव्हते. ते जरी सामाजिक कार्यकर्ते नव्हते, तरी मातीशी नाते असल्यामुळे त्यांचा विचार ठोस आकार घेत असे. युवक क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांना जसे राम बापट एक जेष्ठ विचारवंत मित्र म्हणून लाभले तसे गो पु देखील लाभले. युक्रांदच्या शिबिरात व्याख्यान देण्यासाठी आम्ही त्यांना बोलावत असे. त्यांच्यासोबत विचारांचे आदान प्रदान करतांना खूप आनंद वाटत असे. 

गो पु देशपांडे यांना युवक कांती दलाच्या वतीने आणि माझ्या कुटुंबियांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. 

No comments:

Post a Comment