Thursday 21 June 2012

औरंगाबादची गांधी भवनची इमारत कोणाच्या मालकीची ?


आज दैनिक लोकमत आणि लोकसत्ता मध्ये औरंगाबाद येथील गांधीभवनच्या वादासंदर्भात आलेल्या बातमीवरील खुलासा :

या प्रश्नाची उत्तर शोधण्यासाठी या प्रकरणाचा इतिहास थोडक्यात समजून घेतला पाहिजेत. त्याचे मुद्दे खाली नमूद करीत आहे.

१. महात्मा गांधींच्या हत्तेनंतर तत्काळ वर्ध्याच्या आश्रमात देशातील गांधीवाद्यांची बैठक झाली. बैठकीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद होते. जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद आदि मान्यवर नेते या बैठकीत उपस्थित होते.

२. १९४८ सालात आजच्या महाराष्ट्राचे केवळ १२ जिल्हे मुंबई इलाख्यात होते. महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष स्व. मामासाहेब देवगिरीकर होते. स्वातंत्र्य सैनिक या नात्याने त्यांनी आपले जीवन देशाला समर्पित केले होते. वर्धा येथे झालेल्या बैठकीत ते खूपच भावविवश झाले. त्यांना अश्रू आवरले नाहीत. त्या वेळी ते म्हणाले, "म. गांधींची हत्त्या करणारा नथुराम गोडसे पुण्यातला आहे याचे मला अतीव दुख: आहे. मला अपराधी वाटते. या भावनेतून मुक्त होण्यासाठी मी या क्षणी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. गांधींची शारीरिक हत्त्या झाली असली तरी त्यांची विचारसरणी जिवंत ठेवण्यासाठी मी माझे सर्वस्व वाहणार आहे. या बैठकीत सदर कार्य करण्यासाठी निधी गोळा करण्याचा निर्णय झाला. त्याचा हिशोब ठेवण्यासाठी 'गांधी स्मारक निधी' नावाची एक सोसायटी रजिस्टर करण्यात आली. सोसायटीला निधी करता येतो परंतु मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी सोसायटी कायदेशीर रित्या असमर्थ ठरते. सोसायटीला मालमत्तेची नोंद असलेले रजिस्टर नसते. 

३. गांधी स्मारक निधी या सोसायटीला कारभार करण्यासाठी केंद्रीय पातळीवर एक समिती नेमण्यात आली त्यात कॉंग्रेसचे सर्व राष्ट्रीय नेते होते. स्व. मामासाहेब  देवगिरीकर  हे या समितीचे सदस्य होते. त्यांच्यावर महाराष्ट्रात निधी जमविण्याची जबाबदारी होती. त्यांनी अत्यंत परिश्रम घेवून महाराष्ट्रामध्ये दौरा केला आणि गांधी कार्यासाठी निधी गोळा केला. त्यांनी जिद्द बांधली होती कि नथुराम गोडसे महाराष्ट्रातील असल्याने अन्य कोणत्याही प्रांतापेक्षा महाराष्ट्राने अधिक निधी गोळा केला पाहिजे. महाराष्ट्रातून मामासाहेबांनी त्यावेळी ९० लाख रुपये गोळा केले. त्यावेळच्या महाराष्ट्रात मुंबई शहर धरले जात नव्हते. गांधी स्मारक निधीच्या केंद्रीय समितीने ब्रिटीशांच्या प्रांत रचनेनुसार 'स्टेट कमिट्या' स्थापन केल्या होत्या. महाराष्ट्राच्या स्टेट कमिटीचे अध्यक्ष मामासाहेब देवगिरीकर होते. त्यांना दूरदृष्टी होती. सदाशिव पेठेतील विंचूरकर वाड्यात गांधीवादी मंडळीकडे भाड्याची जागा होती. हि वास्तू वादग्रस्त ठरेल याचा अंदाज घेवून त्यांनी कोथरूड (तत्कालीन खेडे)  येथे १० एकर ५ गुंठे जागा विकत घेतली. तसेच जागा मालकाने ७ गुंठे जमीन दान केली. अशी संस्थेकडे एकूण १० एकर १२ गुंठे जागा आहे. खरेदीखत व बक्षीस पत्र यांच्यावर साहजिकच 'गांधी स्मारक निधी' असेच नाव आहे. 

४. स्वातंत्र्य सैनिकांना काम करण्यासाठी अनेक ठिकाणी समाजाने जागा दिल्या. त्या मालमत्तांवर गांधी तत्वविचार केंद्र अशा नावाने कार्य चालू होते. पण त्या स्वातंत्र्य सैनिकांनंतर त्या मालमत्ता त्यांच्या मुलांकडे, नातेवाईकांकडे अथवा कार्यकर्त्यांकडे खाजगी म्हणून नोंदल्या गेल्या. आजच्या महाराष्ट्रातील अशा २० मालमत्ता संस्थेच्या ताब्यातून गेल्या. असेच देशातही घडले. म्हणून गांधी स्मारक निधीने गांधी जन्म शताब्दी च्या निमित्ताने विकेंद्रीकरणाचा ठराव पास केला. हा ठराव २४ एप्रिल १९६९ रोजी ठराव क्रमांक २२ संमत झालेला आहे. 

५.  भारताने भाषिक राज्यवार पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला. १९५६ सालापर्यंत भाषिक राज्ये अस्थित्वात आली होती. महाराष्ट्र राज्य थोड्या उशिराने १९६० साली स्थापन झाले. 

६. विकेंद्रीकरणाच्या तत्वानुसार गांधी स्मारक निधीच्या स्टेट कामित्यांचे राज्यवार पुब्लिक ट्रस्ट मध्ये रुपांतर झाले. उदा. कर्नाटक गांधी स्मारक निधी, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी.

७. सर्व राज्यांच्या ट्रस्टच्या घटना एकच आहेत. त्या घटनांमध्ये गांधी स्मारक निधीच्या सर्व मालमत्तेचे हक्क राज्यवार सुपूर्द करण्यात आले आहेत. म्हणजे नागपूर, औरंगाबाद, दौंड येथील सर्व मालमत्तेचे पालकत्व महाराष्ट्र गांधी स्मारक निधी या नोंदणीकृत संस्थेकडे आले. 

८. विकेंद्रीकारानानंतर राज्यवार ट्रस्टचे राज्य पातळीवरील विश्वस्त मंडळ वर नमूद केलेल्या मालमत्तांचा कारभार पाहतील. या प्रत्येक ट्रस्टचे अध्यक्ष व सचिव हे दैनंदिन कारभार पाहतील. 

९. रामचंद्र राही हे गांधी स्मारक निधी (केंद्रीय) या संस्थेचे सचिव आहेत. त्यांचे कार्यालय राजघाट येथे आहे. विकेंद्रीकारानानंतर या संस्थेला काही काम उरले नाही. तरी कार्यालय बंद करू नये असे ठरले. त्यांनी स्टेट कमिटीचे ट्रस्ट मध्ये रुपांतर करताना काही निधी स्वतः कडे रोखून धरले. त्याच्या व्याजावर केंद्रीय निधीचा कारभार चालतो. महाराष्ट्राकडे सर्वात जास्त निधी असल्यामुळे महाराष्ट्राकडून १८ लाख रुपये केंद्रीय निधीने आपल्याकडे ठेवले आहेत. दर वर्षी हिशोब व वार्षिक अहवाल केंद्रीय निधीकडे पाठवावा. केंद्रीय निधीकडे ठेवलेल्या निधीच्या व्याजातून काही  रक्कम केंद्रीय निधी स्वत: कडे ठेऊन उर्वरित रक्कम राज्यांना पाठवीत असते. 

१०. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीला दरवर्षी अशी रक्कम मिळत असे. परंतु रामचंद्र राही सचिव झाल्यापासून त्यांनी त्या १८ लाखाशी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचा काही सबंध नाही असे सांगून ती रक्कम बेकायदेशीर रित्या स्वत: च्या अखत्यारीत ठेवली आहे. 

११. भांडणे करणे हा राही यांचा स्वभाव आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि केंद्रीय गांधी स्मारक निधी यांच्यातील वाद उच्च न्यायालयात पोहचला. मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या बाजूने निकाल दिला. त्यावर रामचंद्र राही यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सध्या हा वाद न्याय प्रविष्ट आहे. 

१२. प्रकरण न्याय प्रविष्ट असताना राही सैरभैर होऊन पुण्याच्या आणि औरंगाबादच्या मालमत्तेत ते हस्तक्षेप करू लागले. त्यासाठी ते मिळेल त्या माणसाला हाताशी धरत आहेत. 

बाळासाहेब भारदे यांच्या निधनानंतर मी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळत आहे. अध्यक्ष म्हणून संस्थेच्या मालमत्तांचे रक्षण करणे माझे कर्तव्य आहे. पुण्याच्या मालमत्तेवर जी अतिक्रमणे काढण्याचा मी प्रयत्न करीत आहे त्यांना राही प्रोत्साहन देत असतात. माझे असे ठाम मत झाले आहे कि, गांधी विचार सरणी आणि राही यांचा अर्था अर्थी काहीही संबंध नाही. या इसमाला केंद्रीय गांधी स्मारक निधीच्या सचिव पदावरून काढल्याशिवाय कोणालाच कार्य करणे शक्य होणार नाही असे दिसते. हा माणूस वृद्ध व विकलांग अशी माणसे विश्वस्त म्हणून घेऊन आपले स्थान अबाधित राखत आहे. माजी न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी केंद्रीय निधीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे मुख्य कारण राही यांची मनमानी हेच होते. राजीनामा देताना त्यांनी राही यांना जे पत्र लिहिले आहे ते प्रसिद्ध झाले तर राही यांच्या कारवायांवर प्रकाश पडतो. 

औरंगाबाद येथील समर्थनगर येथील जागा महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या ताब्यात आहे. औरंगाबाद नगरपालिकेची रीतसर परवानगी घेऊन महाराष्ट्र गांधी स्मारक निधीने तिथे गांधीभवन बांधले आहे. त्या मालमत्तेत राही यांनी श्रीराम जाधव व ज्ञान प्रकाश जाधव यांना नियुक्तीचे पत्र देवून त्यांना गुंडगिरी करण्याचा परवानाच दिला आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीला डावलून केंद्रीय निधीला असे पत्र देण्याचा कोणताही अधिकार नाही. राही हे धर्मादाय आयुक्तांपेक्षाही मोठे असल्याचा प्रयत्न करीत आहेत. हा माणूस आत्मकेंद्री आहे. 

औरंगाबाद मध्ये ब्राह्मणविरोधी, युक्रांद विरोधी भावना व मराठवाड्याची अस्मिता असे चुकीचे मुद्दे घेऊन श्रीराम जाधव व मोदाणी यांच्या भोवती एक टोळके उभे राहिले आहे. यातील काही लोकांना डॉ. कुमार सप्तर्षी यांचा द्वेष करण्यात गेली तीस वर्षे धन्यता वाटते. युक्रांद फोडण्यात हीच मंडळी अग्रेसर होती. तरीही युक्रांद जिवंत आहे आणि जोमदारपणे कार्य करीत आहे याचे त्यांना वैषम्य वाटते. 

गोपाळ गुनाले हे युक्रांदचे पूर्णवेळ कार्यकर्ते असून ते महाराष्ट्राचे कार्यवाह आहेत. ते लातूरचे आहेत. मराठवाड्यामध्ये जे युक्रांद नव्याने उभे राहिले त्याचे नेतृत्व ओघानेच त्यांच्याकडे येणार आहे. गांधीवादाची नवीन मांडणी करताना माझी व महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचा धारणा अशी आहे कि युवकांचा व गांधींच्या विचारसरणीचा एक योग जुळवून आणला तरच भावी पिढ्यांमध्ये गांधींचे विचार जिवंत राहतील. या धोरणानुसार औरंगाबाद गांधीभवन हे मराठवाड्यातील युवकांसाठी आम्ही खुले केले आहे. सध्या गांधीभवन येथे 'परिवर्तनवादी युवक संमेलनाचे' कार्यालय चालू आहे. हे संमेलन महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल असे सहकार्याने होणार आहे. युक्रांद ला निर्जीव मालमत्तेत रस नाही, पण म. गांधींच्या विचारांशी त्यांचे आत्मिक नाते आहे. 

एकेकाळी मी मराठवाड्यामध्ये खूप फिरलो आहे. अनेक आंदोलने केली आहेत. मराठवाड्याच्या बहुजन समाजाचा स्वभाव मला बर्यापैकी कळतो. औरंगाबाद मध्ये २ महिने राहून दलित शिस्यावृत्ती वाढीचे आंदोलन मी केले आहे. औरंगाबाद मधील बहुतांश लोकांना मी ओळखतो. १९८३ मधील युक्रांद च्या दलित शिश्यव्रुती वाढीच्या आंदोलनामुळे देशभरातील ५४ मागासवर्गीय जातींना काळानुसार पुरेसे विद्यावेतन मिळाले. त्यामुळे दलित वर्गातील पिढ्यानपिढ्या शिकू शकल्या. १९७३ साली हे आंदोलन झाले त्यावेळी दलित विद्यार्थ्यांना केवळ ४० रुपये दरमहा विध्यावेतन मिळत होते. त्यापैकी २७ रुपये भोजनासाठी आणि १३ रुपये खोली भाड्यासाठी मिळत असत. आज मात्र त्यांना भोजन, निवास व फी याची संपूर्ण व्यवस्था शासन करते. त्या आंदोलनाला ज्या प्रवृत्तींनी विरोध केला होता त्याच प्रव्रुती आज मला विरोध करीत आहेत. मी त्याचा मुकाबला करण्यास समर्थ आहे. सत्य सक्रीय असले तर यशस्वी होते. निष्क्रिय सत्य पराभूत होते. या अप्रवृत्तींचा निरास करण्यासाठी मी सक्रीय राहणार आहे. 

No comments:

Post a Comment