Sunday 20 October 2013

साथी जॉर्ज फर्नाडीस

परवा दिवशी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या हस्ते साथी जॉर्ज फर्नांडीस यांच्या बद्दलच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या ग्रंथात जॉर्ज यांच्या व्यक्तिमत्वाचे मूल्यमापन करणारे अनेक मित्रांचे लेख आहेत. या ग्रंथाचे संपादन युक्रांचे रंगा राचुरे आणि प्रा जयदेव डोळे यांनी केले आहे. सध्या साथी जॉर्ज हे विकलांग आणि स्मृतीभृंशच्या विकाराने घेरलेले आहेत. या पार्श्वभूमीवर जॉर्ज यांचे परमशिष्य नितीशकुमार या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले हे विशेष उल्लेखनीय. या कार्यक्रमाला बरीच गर्दी होती. या पुस्तक प्रकाशनाच्या बातमीमुळे माझ्या मनात जॉर्ज विषयीच्या आठवणी उचंबळून आल्या. या ग्रंथात माझा लेख समाविष्ठ आहे असे कळते.

वयाच्या २५ व्या वर्षी जॉर्ज माझ्या मनातला आदर्श हिरो होता. संघर्ष कसा हाताळायचा हे शिकायचे असेल तर जॉर्जला प्रत्यक्ष कृतीमध्ये पाहणे मोलाचे असे. मुंबईला कामगारांचा एखादा संप जॉर्जच्या नेतृत्वाखाली चालू असला तर मी मुंबईला खास करून जात असे. त्यावेळी जॉर्ज बरोबर राहणे हाच मोठा अनुभव असे. आम्ही टक्सी मधून फिरायचो, गाडीत केळीचे घड घेतलेले असायचे, मुंबईत घामाच्या धारा लागलेल्या असायच्या. केळी खात खात फिरायचो, सभा करायचो. अनेक वेळा संप फुटण्याच्या बातम्या यायच्या. प्रत्यक्ष कामगारासमोर उभे राहिल्यानंतर जॉर्जची पटवून देण्याची हातोटी एवढी विलक्षण होती कि त्याच्या भाषणानंतर पुन्हा संपाला धार चढायची.

जॉर्ज मुंबईत आला तो कर्नाटकातील मेंगलोर या शहरातून. डिमेलो नांवाचे मेंग्लोरचे एक मुंबईत कामगारांचे नेते होते. मुंबई पोलिसांनी त्यांना तडीपार केले होते, म्हणून डिमेलो त्यांच्या गावी काही काळ वास्तव्य केले. तेंव्हा त्यांचा आणि जॉर्जचा परिचय झाला. जॉर्ज मुंबईत आल्या नंतर कामगार युनियनच्या कार्यालयासमोरील फुटपाथ वर झोपत असे. पुढे बाळासाहेब ठाकरे आणि जॉर्ज फर्नांडीस एका भाड्याच्या खोलीत राहत असत. डिमेलो यांचा अचानक देहांत झाला. नंतर जोर्जने त्यांच्या अख्यात्यारीतील युनियन सांभाळल्याच आणि त्यात अनेक युनियनची भर  केली.  त्याचे लक्ष चाक बंद करून मुंबईची गती शुन्य करणे यावर होते. त्यामुळे बेस्ट बस, टक्सी, रेल्वे, रिक्षा अश्या चाकाशी संबंधित युनियन बांधल्या. त्याचबरोबर सफाई कामगार यांचीही संघटना बांधली. जॉर्जच्या नेतृत्वाखाली एका युनियन चा संप सुरु झाला कि त्याच्या इतरही युनियन संप करायच्या. ''मुंबई बंद'' हा इशारा फक्त जॉर्ज देवू शकायचा. म्हणूनच त्याला बंदचा राजा हि पदवी मिळाली.


नितीशकुमार या कार्यक्रमाला आले याचा अर्थ त्यांनी आपले मूळ वैचारिक खानदान समाजवादी असल्याचे दाखवून दिले. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात लालू आणि नितीश हे दोघेही होते. जॉर्जच्या च्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय रेल्वे संप झाला होता. संपूर्ण महिनाभर रेल्वेचे चाक बंद होते. रेल्वे संपाचा धसका घेवून इंदिरा गांधीनी आणीबाणी लावली असे बोलले जाते.

जोर्ज ला लहानपणी ख्रिचन मठात धर्मगुरू होण्यासाठी दाखल केले होते. त्यामुळे त्याच्या अंगी कामाची शिस्त होती. ख्रिचन सेमिनरी मध्ये latin भाषा शिकल्याने त्या भाषेतून उत्पन्न झालेल्या पाशिमात्य भाषा अवगत होत्या. भाषा याने हि जॉर्ज ला देणगीच होती. 'तुळु, कन्नड, मराठी, हिंदी, बंगाली, इंग्रजी या भाषांमध्ये तो केवळ संवाद नव्हे तर भाषण करू शकत असे. असे हे लोभस व्यक्तिमत्व आजारामुळे जिवंत असून काळाच्या पडद्याआड गेले आहे. 

No comments:

Post a Comment