Wednesday 28 November 2012

बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतरची सेना


सप्रेम नमस्कार!


बरेच दिवस, नव्हे काही महिने मी ऑफलाईन होतो. कारण परदेशात गेलो होतो. त्याच्या आधी सत्याग्रहीचा दिवाळी अंक आणि गांधी स्मारक निधीतर्फे साजरा होणारा गांधी सप्ताह वगैरे गडबडीत होतो. मधल्या काळात सर्वात मोठी व दखलपात्र घटना म्हणजे शिवसेनेचे सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे निधन. ही दुर्देवी व भावनात्मक घटना असली तरी त्यांचे मरण नैसर्गिक होते ही गोष्ट लक्षात घेतली पाहीजे. त्याच्या नंतर शिवसेना वाटचाल कशी करणार हा महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्या मोठा प्रश्न आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला शिवसेनेतील इलेक्टीव मेरीट असलेले युवक आपल्यामध्ये सामावून घ्यावेत अशी स्वाभाविक इच्छा दिसते. कारण बाळासाहेब ठाकरे यांना श्रध्दांजली वाहणा-या संपूर्ण पानाच्या महागडया जाहिराती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने दिल्या आहेत. वृत्तपत्रांबरोबरच दुरचित्रवाहिन्यांवर श्रध्दांजली आणि ज्यांनी जाहिरात दिली त्यांची नावे यांचे सर्वेक्षण केल्यास पुन्हा याच पक्षाचे नाव घ्यावे लागते. परंतु प्रश्न वाटतो तेवढा सोपा नाही. शिवसेनेचे स्थानिक नेते राष्ट्रवादीमध्ये जाण्यापूर्वी प्रथेप्रमाण आधी तिकीट व नंतर पक्षप्रवेश या तत्वाचा अंगिकार करतील. दोन्ही कॉंग्रेस पक्षांची आघाडी असल्याने राष्ट्रवादीला आपल्या कोटयातूनच शिवसेनेच्या लोकांना उमेदवा-या द्याव्या लागतील. त्यामुळे कदाचित राष्ट्रवादीचे लोक शिवसेनेत जातील. म्हणजे राजकारणात कुणी कुणाला गिळून टाकू शकणार नाही. 

दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे मनसे आणि शिवसेना यांचे एकत्रिकरण होईल काय? या प्रश्नाबद्‌दल जे विचार सध्या व्यक्त केले जात आहेत. त्यात भाबडेपणा अधिक दिसतो. एक लक्षात घेतले पाहिजे की, बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत राज ठाकरे यांनी फारकत घेतली होती. वास्तविक बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वारस राज ठाकरे हेच होते. परंतु त्यांनी विद्यार्थी सेनेपासून सवतासुभा निर्माण केला होता. सवता सुभा याचाच अर्थ असा की, त्यांनी त्यांचे निष्ठावंत हनुमान गोळा केले होते. त्यांची निष्ठा शिवसेनेत गेल्यांनतर बदलणे शक्य नाही. त्यामुळे एकत्रिकरणात दोन प्रवाह कायम अलग राहतील. अर्थात नद्या वेगळया असल्या तरी एखाद्या उतारावर त्यांचा संगम होतो. परंतु समांतर अंतर ठेवून वाहणा-या दोन प्रवाहांचा संगम सहसा लवकर होत नाही. समाजवादी फुटले, कम्युनिष्ट फुटले, कॉंग्रेस फुटली; त्यानंतर पुन्हा प्रवाह एकत्र आले नाहीत. आणिबानी नंतर कॉंग्रेस फुटली आणि इंदिरा कॉंग्रेस नावाचा नवा पक्ष उदयाला आला. तो जुन्या कॉंग्रेस पक्षापेक्षा वेगळया राजकीय चारित्रयाचा पक्ष आहे. डावे व उजवे कम्युनिष्ट पक्ष एकत्र आले नाहीत. तसेच प्रजासमाजवादी व संयुक्त समाजवादी फुटल्यानंतर एकत्र आले नाहीत. रिपब्लिकन पक्षाचे 25 - 30 तुकडे झाले. ते एकत्र आले नाहीत. मनसे मध्ये शिवसेना विलय पावू शकत नाही. कारण एकच! नदी समुद्राला मिळते, पण समुद्र कधी नदीत शिरत नाही. याचा अर्थ एकत्रीकरणासाठी मनसेला शिवसेनेमध्ये विलीन व्हावे लागेल. याला राज ठाकरे तयार होतील असे वाटत नाही. आगामी निवडणूकीत मनसे व भाजपा यांची युती होण्याची शक्यता अधिक आहे. अशा वेळी सोनिया कॉंग्रेस व शिवसेना उघड वा छुप्या रितीने समझोता करतील ही शक्यता अधिक आहे. कारण ऍन्टी कॉंग्रेसीझमचा काळ संपुष्टात आला आहे. 

शिवसेनेने नवीन कार्यप्रणाली स्वीकारली व आपले राजकीय चारित्रय बदलले तर तो पक्ष महाराष्टा्रतील एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आकाराला येवू शकतो. त्यांच्यामध्ये ही सुप्त शक्ती आहे. त्यासाठी उध्दव ठाकरे यांना आदेश काढून शिवसेनेत लोकशाही आणावी लागेल. हे विधान प्रथमदर्शनी विचित्र वाटेल, पण जबाबदार विरोधीपक्ष व्हायचे असेल तर अंतर्गत लोकशाही आणि कायद्याच्या राज्याला बांधीलकी मानावीच लागते. काही काळ तरी शिवसेनीकांच्या बौध्दीक सवयीनुसार त्यांच्यामधील बदल आदेशानेच घडवून आणावे लागतील. तेवढी प्रगल्भता उध्दव ठाकरे दाखवू शकतात यावर माझा विश्वास आहे. याला कारण आहे. मनोहर जोशी शिवसेेनेतर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, परंतु त्यांनी एखाद्या गल्लीतल्या शाखाप्रमुखाप्रमाणे थिल्लरपणा दाखविला. स्वत:च्या मालकीची जागा वाचविण्यासाठी ते म्हणाले की, ‘कायद्याने शिवाजीपार्कवर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात आले तर ठीकच, अन्यथा शिवसैनिक कायदा हातात घेवून स्मारक उभारतील’. मनोहर जोशी हे कधीतरी मुख्यमंत्री होते असे म्हणण्याचे धाडस कुणी करणार नाही असे त्यांचे वक्तव्य आहे. पण उध्दव ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्यासह सर्वांनाच संयम राखण्याचा आदेश दिला. यावरून हे सिध्द होते की, उध्दव ठाकरे प्रगल्भ आहेत. 

Thursday 21 June 2012

औरंगाबादची गांधी भवनची इमारत कोणाच्या मालकीची ?


आज दैनिक लोकमत आणि लोकसत्ता मध्ये औरंगाबाद येथील गांधीभवनच्या वादासंदर्भात आलेल्या बातमीवरील खुलासा :

या प्रश्नाची उत्तर शोधण्यासाठी या प्रकरणाचा इतिहास थोडक्यात समजून घेतला पाहिजेत. त्याचे मुद्दे खाली नमूद करीत आहे.

१. महात्मा गांधींच्या हत्तेनंतर तत्काळ वर्ध्याच्या आश्रमात देशातील गांधीवाद्यांची बैठक झाली. बैठकीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद होते. जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद आदि मान्यवर नेते या बैठकीत उपस्थित होते.

२. १९४८ सालात आजच्या महाराष्ट्राचे केवळ १२ जिल्हे मुंबई इलाख्यात होते. महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष स्व. मामासाहेब देवगिरीकर होते. स्वातंत्र्य सैनिक या नात्याने त्यांनी आपले जीवन देशाला समर्पित केले होते. वर्धा येथे झालेल्या बैठकीत ते खूपच भावविवश झाले. त्यांना अश्रू आवरले नाहीत. त्या वेळी ते म्हणाले, "म. गांधींची हत्त्या करणारा नथुराम गोडसे पुण्यातला आहे याचे मला अतीव दुख: आहे. मला अपराधी वाटते. या भावनेतून मुक्त होण्यासाठी मी या क्षणी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. गांधींची शारीरिक हत्त्या झाली असली तरी त्यांची विचारसरणी जिवंत ठेवण्यासाठी मी माझे सर्वस्व वाहणार आहे. या बैठकीत सदर कार्य करण्यासाठी निधी गोळा करण्याचा निर्णय झाला. त्याचा हिशोब ठेवण्यासाठी 'गांधी स्मारक निधी' नावाची एक सोसायटी रजिस्टर करण्यात आली. सोसायटीला निधी करता येतो परंतु मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी सोसायटी कायदेशीर रित्या असमर्थ ठरते. सोसायटीला मालमत्तेची नोंद असलेले रजिस्टर नसते. 

३. गांधी स्मारक निधी या सोसायटीला कारभार करण्यासाठी केंद्रीय पातळीवर एक समिती नेमण्यात आली त्यात कॉंग्रेसचे सर्व राष्ट्रीय नेते होते. स्व. मामासाहेब  देवगिरीकर  हे या समितीचे सदस्य होते. त्यांच्यावर महाराष्ट्रात निधी जमविण्याची जबाबदारी होती. त्यांनी अत्यंत परिश्रम घेवून महाराष्ट्रामध्ये दौरा केला आणि गांधी कार्यासाठी निधी गोळा केला. त्यांनी जिद्द बांधली होती कि नथुराम गोडसे महाराष्ट्रातील असल्याने अन्य कोणत्याही प्रांतापेक्षा महाराष्ट्राने अधिक निधी गोळा केला पाहिजे. महाराष्ट्रातून मामासाहेबांनी त्यावेळी ९० लाख रुपये गोळा केले. त्यावेळच्या महाराष्ट्रात मुंबई शहर धरले जात नव्हते. गांधी स्मारक निधीच्या केंद्रीय समितीने ब्रिटीशांच्या प्रांत रचनेनुसार 'स्टेट कमिट्या' स्थापन केल्या होत्या. महाराष्ट्राच्या स्टेट कमिटीचे अध्यक्ष मामासाहेब देवगिरीकर होते. त्यांना दूरदृष्टी होती. सदाशिव पेठेतील विंचूरकर वाड्यात गांधीवादी मंडळीकडे भाड्याची जागा होती. हि वास्तू वादग्रस्त ठरेल याचा अंदाज घेवून त्यांनी कोथरूड (तत्कालीन खेडे)  येथे १० एकर ५ गुंठे जागा विकत घेतली. तसेच जागा मालकाने ७ गुंठे जमीन दान केली. अशी संस्थेकडे एकूण १० एकर १२ गुंठे जागा आहे. खरेदीखत व बक्षीस पत्र यांच्यावर साहजिकच 'गांधी स्मारक निधी' असेच नाव आहे. 

४. स्वातंत्र्य सैनिकांना काम करण्यासाठी अनेक ठिकाणी समाजाने जागा दिल्या. त्या मालमत्तांवर गांधी तत्वविचार केंद्र अशा नावाने कार्य चालू होते. पण त्या स्वातंत्र्य सैनिकांनंतर त्या मालमत्ता त्यांच्या मुलांकडे, नातेवाईकांकडे अथवा कार्यकर्त्यांकडे खाजगी म्हणून नोंदल्या गेल्या. आजच्या महाराष्ट्रातील अशा २० मालमत्ता संस्थेच्या ताब्यातून गेल्या. असेच देशातही घडले. म्हणून गांधी स्मारक निधीने गांधी जन्म शताब्दी च्या निमित्ताने विकेंद्रीकरणाचा ठराव पास केला. हा ठराव २४ एप्रिल १९६९ रोजी ठराव क्रमांक २२ संमत झालेला आहे. 

५.  भारताने भाषिक राज्यवार पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला. १९५६ सालापर्यंत भाषिक राज्ये अस्थित्वात आली होती. महाराष्ट्र राज्य थोड्या उशिराने १९६० साली स्थापन झाले. 

६. विकेंद्रीकरणाच्या तत्वानुसार गांधी स्मारक निधीच्या स्टेट कामित्यांचे राज्यवार पुब्लिक ट्रस्ट मध्ये रुपांतर झाले. उदा. कर्नाटक गांधी स्मारक निधी, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी.

७. सर्व राज्यांच्या ट्रस्टच्या घटना एकच आहेत. त्या घटनांमध्ये गांधी स्मारक निधीच्या सर्व मालमत्तेचे हक्क राज्यवार सुपूर्द करण्यात आले आहेत. म्हणजे नागपूर, औरंगाबाद, दौंड येथील सर्व मालमत्तेचे पालकत्व महाराष्ट्र गांधी स्मारक निधी या नोंदणीकृत संस्थेकडे आले. 

८. विकेंद्रीकारानानंतर राज्यवार ट्रस्टचे राज्य पातळीवरील विश्वस्त मंडळ वर नमूद केलेल्या मालमत्तांचा कारभार पाहतील. या प्रत्येक ट्रस्टचे अध्यक्ष व सचिव हे दैनंदिन कारभार पाहतील. 

९. रामचंद्र राही हे गांधी स्मारक निधी (केंद्रीय) या संस्थेचे सचिव आहेत. त्यांचे कार्यालय राजघाट येथे आहे. विकेंद्रीकारानानंतर या संस्थेला काही काम उरले नाही. तरी कार्यालय बंद करू नये असे ठरले. त्यांनी स्टेट कमिटीचे ट्रस्ट मध्ये रुपांतर करताना काही निधी स्वतः कडे रोखून धरले. त्याच्या व्याजावर केंद्रीय निधीचा कारभार चालतो. महाराष्ट्राकडे सर्वात जास्त निधी असल्यामुळे महाराष्ट्राकडून १८ लाख रुपये केंद्रीय निधीने आपल्याकडे ठेवले आहेत. दर वर्षी हिशोब व वार्षिक अहवाल केंद्रीय निधीकडे पाठवावा. केंद्रीय निधीकडे ठेवलेल्या निधीच्या व्याजातून काही  रक्कम केंद्रीय निधी स्वत: कडे ठेऊन उर्वरित रक्कम राज्यांना पाठवीत असते. 

१०. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीला दरवर्षी अशी रक्कम मिळत असे. परंतु रामचंद्र राही सचिव झाल्यापासून त्यांनी त्या १८ लाखाशी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचा काही सबंध नाही असे सांगून ती रक्कम बेकायदेशीर रित्या स्वत: च्या अखत्यारीत ठेवली आहे. 

११. भांडणे करणे हा राही यांचा स्वभाव आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि केंद्रीय गांधी स्मारक निधी यांच्यातील वाद उच्च न्यायालयात पोहचला. मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या बाजूने निकाल दिला. त्यावर रामचंद्र राही यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सध्या हा वाद न्याय प्रविष्ट आहे. 

१२. प्रकरण न्याय प्रविष्ट असताना राही सैरभैर होऊन पुण्याच्या आणि औरंगाबादच्या मालमत्तेत ते हस्तक्षेप करू लागले. त्यासाठी ते मिळेल त्या माणसाला हाताशी धरत आहेत. 

बाळासाहेब भारदे यांच्या निधनानंतर मी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळत आहे. अध्यक्ष म्हणून संस्थेच्या मालमत्तांचे रक्षण करणे माझे कर्तव्य आहे. पुण्याच्या मालमत्तेवर जी अतिक्रमणे काढण्याचा मी प्रयत्न करीत आहे त्यांना राही प्रोत्साहन देत असतात. माझे असे ठाम मत झाले आहे कि, गांधी विचार सरणी आणि राही यांचा अर्था अर्थी काहीही संबंध नाही. या इसमाला केंद्रीय गांधी स्मारक निधीच्या सचिव पदावरून काढल्याशिवाय कोणालाच कार्य करणे शक्य होणार नाही असे दिसते. हा माणूस वृद्ध व विकलांग अशी माणसे विश्वस्त म्हणून घेऊन आपले स्थान अबाधित राखत आहे. माजी न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी केंद्रीय निधीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे मुख्य कारण राही यांची मनमानी हेच होते. राजीनामा देताना त्यांनी राही यांना जे पत्र लिहिले आहे ते प्रसिद्ध झाले तर राही यांच्या कारवायांवर प्रकाश पडतो. 

औरंगाबाद येथील समर्थनगर येथील जागा महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या ताब्यात आहे. औरंगाबाद नगरपालिकेची रीतसर परवानगी घेऊन महाराष्ट्र गांधी स्मारक निधीने तिथे गांधीभवन बांधले आहे. त्या मालमत्तेत राही यांनी श्रीराम जाधव व ज्ञान प्रकाश जाधव यांना नियुक्तीचे पत्र देवून त्यांना गुंडगिरी करण्याचा परवानाच दिला आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीला डावलून केंद्रीय निधीला असे पत्र देण्याचा कोणताही अधिकार नाही. राही हे धर्मादाय आयुक्तांपेक्षाही मोठे असल्याचा प्रयत्न करीत आहेत. हा माणूस आत्मकेंद्री आहे. 

औरंगाबाद मध्ये ब्राह्मणविरोधी, युक्रांद विरोधी भावना व मराठवाड्याची अस्मिता असे चुकीचे मुद्दे घेऊन श्रीराम जाधव व मोदाणी यांच्या भोवती एक टोळके उभे राहिले आहे. यातील काही लोकांना डॉ. कुमार सप्तर्षी यांचा द्वेष करण्यात गेली तीस वर्षे धन्यता वाटते. युक्रांद फोडण्यात हीच मंडळी अग्रेसर होती. तरीही युक्रांद जिवंत आहे आणि जोमदारपणे कार्य करीत आहे याचे त्यांना वैषम्य वाटते. 

गोपाळ गुनाले हे युक्रांदचे पूर्णवेळ कार्यकर्ते असून ते महाराष्ट्राचे कार्यवाह आहेत. ते लातूरचे आहेत. मराठवाड्यामध्ये जे युक्रांद नव्याने उभे राहिले त्याचे नेतृत्व ओघानेच त्यांच्याकडे येणार आहे. गांधीवादाची नवीन मांडणी करताना माझी व महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचा धारणा अशी आहे कि युवकांचा व गांधींच्या विचारसरणीचा एक योग जुळवून आणला तरच भावी पिढ्यांमध्ये गांधींचे विचार जिवंत राहतील. या धोरणानुसार औरंगाबाद गांधीभवन हे मराठवाड्यातील युवकांसाठी आम्ही खुले केले आहे. सध्या गांधीभवन येथे 'परिवर्तनवादी युवक संमेलनाचे' कार्यालय चालू आहे. हे संमेलन महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल असे सहकार्याने होणार आहे. युक्रांद ला निर्जीव मालमत्तेत रस नाही, पण म. गांधींच्या विचारांशी त्यांचे आत्मिक नाते आहे. 

एकेकाळी मी मराठवाड्यामध्ये खूप फिरलो आहे. अनेक आंदोलने केली आहेत. मराठवाड्याच्या बहुजन समाजाचा स्वभाव मला बर्यापैकी कळतो. औरंगाबाद मध्ये २ महिने राहून दलित शिस्यावृत्ती वाढीचे आंदोलन मी केले आहे. औरंगाबाद मधील बहुतांश लोकांना मी ओळखतो. १९८३ मधील युक्रांद च्या दलित शिश्यव्रुती वाढीच्या आंदोलनामुळे देशभरातील ५४ मागासवर्गीय जातींना काळानुसार पुरेसे विद्यावेतन मिळाले. त्यामुळे दलित वर्गातील पिढ्यानपिढ्या शिकू शकल्या. १९७३ साली हे आंदोलन झाले त्यावेळी दलित विद्यार्थ्यांना केवळ ४० रुपये दरमहा विध्यावेतन मिळत होते. त्यापैकी २७ रुपये भोजनासाठी आणि १३ रुपये खोली भाड्यासाठी मिळत असत. आज मात्र त्यांना भोजन, निवास व फी याची संपूर्ण व्यवस्था शासन करते. त्या आंदोलनाला ज्या प्रवृत्तींनी विरोध केला होता त्याच प्रव्रुती आज मला विरोध करीत आहेत. मी त्याचा मुकाबला करण्यास समर्थ आहे. सत्य सक्रीय असले तर यशस्वी होते. निष्क्रिय सत्य पराभूत होते. या अप्रवृत्तींचा निरास करण्यासाठी मी सक्रीय राहणार आहे. 

Tuesday 6 March 2012

५ राज्यांमधील निवडणुकांचे निकाल



५ राज्यांमधील निवडणुकांचे निकाल 

२६ फेब्रुवारी रोजी परिवर्तनवादी युवक संमेलन पार पडले त्यातून बर्याच सकारात्मक गोष्टी कळल्या. निवडणुका पाहून ज्यांचे मन विषन्न होते अशांना आक्रमक अहिंसा, सत्य, अन्याय व भ्रष्टाचार मुक्त समाज असे शब्द कानावर पडल्यानंतर जणू रणरणत्या उन्हात वळवाच्या पावसाच्या लहरी याव्यात असे अनेकांना वाटले. 

त्यांनतर आले निवडणुकीचे निकाल निकाल ऐकून असे वाटले कि, युक्रांदला मिळणारा प्रतिसाद हा वळवाचा पाउस नसून हा तर बदलत्या काळाच्या पाऊलखुणा आहेत. उत्तरप्रदेशमध्ये मुलायमसिंग यादवांच्या समाजवादी पक्षाला, गोव्यामध्ये भाजपला, पंजाबमध्ये अकाली दलाला व मणिपूर मध्ये कॉंग्रेस पक्षाला निर्विवाद बहुमत मिळाले आहे. उत्तराखंड राज्यात कोन्ग्रेस व भाजप यांच्यात बरोबरीची टक्कर चालू आहे. या निवडणुकीतून ज्या शक्ती उभारून आले आणि जे प्रवाह उभारून आले त्यातून भारतीय लोकशाहीचे भवितव्य उज्वल आहे असे दिसून येते. सामान्य मतदार सर्वांकडून पैसे घेतो आणि मत मात्र नीट विचार करून टाकतो. पैसे देणार्याला तो मनात नाही, म्हणून पैसा वाटून कोणी सत्ता प्राप्त करू शकेल हा समाज या निवडणुकीने खोटा ठरविला. बाबरी मस्जिद पडल्यापासून देशातील 'बॉडी पोलिटिक्स' fracture झाली आहे असे दिसते. सत्तारूढ पक्ष व विरोधी पक्ष यांच्या मध्ये राष्ट्रीय हिताच्या व समाज हिताच्या एकही बाबीवर एकमत नाही. लोकशाहीमध्ये इतका विरोधाभास चालत नाही. तत्व विचारसरानिमध्ये मतभेद आहेत म्हणून एकमत होत नाही असे मानाने चुकीचे ठरेल कारण तत्व विचारसरन्या राजकीय पक्षांनी कधीच सोडून दिल्या आहे. सार्वजनिक नितीमत्ता हि चीज राजकारणातून गायब झाली आहे. म्हणून मतभेद सच्चे नाहीत. सत्तेची स्पर्धा आहे म्हणून मतभेद आहेत. चोख कारभारासाठी स्पर्धा नाही. आजच्या निवडणुकीच्या निकालापासून काय शिकायचे? 

पहिला धडा हा शिकायला हवा कि लोकांना राजकीय स्थर्य हवे आहे म्हणून एकेका राज्यात एकाच पक्षाची सत्ता आली. राज्य पूर्ण हातात दिल्यामुळे आता कुरकुर करायला जागा नाही. घराणेशाहीचा प्रभाव दिवसेंदिवस कमी होत आहे. देशाची सत्ता एका घराण्यात होती. कारण कोन्ग्रेस पक्षाची निरंकुश सत्ता देशावर होती. आता राज्यावर स्थानिक घराणेशाही निर्माण झाली आहे. राहुल गांधी यांच्या कष्टाचा प्रभाव पडला नाही याचेही कारण आहे. ते उत्तर प्रदेशातील राजघराण्यातील लोकांना घेऊन फिरत होते. बसपा हा पक्ष मुळात सरंजामशाहीच्या विरोधात दलित जनतेचा उठाव होता. युपी मध्ये राहुल गांधी राजे राजवाड्यांना सोबत घेऊन लोकांच्या मनात प्रवेश करू शकले नाहीत. जुन्या राज घराण्यांना नकार देणे हे लोकशाहीच्या प्रगतीचे लक्षण  आहे. राहुल गांधी यांना व्यक्तिश: लोकांचा नकार नाह्वता. मायावती यांचा बसपा फक्त जातीय अस्मितांचा वापर करून सत्ता प्राप्त करणारा पक्ष आहे. जणू जातीय अस्मिता ही कर्तव्यदक्षता, नितीमत्ता, प्रामाणिकपणा, सार्वजनिक चारित्र्य यांच्या पेक्षा महान गोष्ट आहे.  जातीय अस्मिता जागृत असून सुद्धा मायावतीच्या राजकीय वर्तनाचा राग लोकांनी व्यक्त केला आहे. मायावतीचा आत्मकेंद्री व भ्रष्टाचारीपानाची लोकांना शिसारी आली. मुलायम सिंग यादव हे डॉ. लोहिया याचे शिष्य. त्यांचे नेतृत्व चळवळीतून वर आलेले आहे. जेह्वा मुस्लीम मतदार व भांडवल्दारांसारखे अमरसिंग सारखे दलाल यांच्या पैकी एकाची निवड करण्याची वेळ आली असताना मुलायम सिंग यांनी मुस्लीम मतदारांची निवड केली. बाबरी मस्जिद पडण्याचा एक प्रयत्न त्यांनी मुख्यमंत्री असताना हाणून पडला होता. मायावती या अगोदर मुलायमसिंग बरोबर होत्या परंतु नंतर त्या भाजप बरोबर गेल्या. मुलायम सिंगनी आपली भूमिका उठल्पानाने कधीही बदलली नाही, त्यामुळे मायावती यांना नकार द्यायची मानसिकता तयार झाली त्यावेळी समाजवादी पास्खाशिवाय अन्य कोणताही पर्याय नाह्वता. जेवढ्या जागा बसपाच्या कमी झाल्या तेवढ्याच जागा समाजवादी पार्टीच्या वाढल्या आहेत.


पंजाबचे निकाल पहा. अकाली दल हा जात शेतकऱ्यांचा पक्ष आहे. देशातील राजकीय प्रवाह असा दिसतोय कि मधल्या जातीचे नेते सत्तेकडे खुच करीत आहेत. जातीय समीकरणाच्या नावाखाली मध्यम जातीचा नेता आणि सवर्णांचे शेपूट हा फोर्मुला यशस्वी ठरतो आहे. हाच फोर्मुला मायावती यांनी वापरला होता. दलित अस्मितेला ब्राह्मण जातीचे शेपूट चिकटविले. पंजाब मध्ये जाटांच्या सत्तेला भाजपच्या बनियाचे शेपूट आहे. तसेच बिहार मध्ये नितीश कुमार यांच्या मंडलांकित जातीसमुहाला भाजपच्या बनियांचे शेपूट आहे. जातीय समीकरणांचा सूर्य मावळतीला लागला आहे. हा संदेश हि निवडणूक देत आहे. एकाच सत्तेच्या आघाडीतील दोन पक्ष एकमेकांवर थुंकत, लाथा मारीत राज्य करू शकणार नाहीत म्हणून लोकांनी आघाडी एवजी एकाच पक्षाला बहुमत दिले आहे. महाराष्ट्रात सत्तेत एकत्र बसणारे आघाडीतील दोन पक्ष जाहीररित्या कुत्र्या मांजरा प्रमाणे एकमेकांना चावा घेवू लागले तर त्या दोघांचे राज्य लोक नाकारतील. 

मणिपूर येथे नागा अतिरेक्यांनी उच्छाद मांडला आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा गेली काही महिने बंद होता. याची प्रतिक्रिया म्हणून लोकांनी राज्य सरकारपेक्षा अधिक समर्थ असलेल्या केंद्र सरकारला मत दिले आहे.  म्हणून तेथे कॉंग्रेसचे सरकार आले आहे. 

गोवा या भूमीवर सारस्वत ब्राह्मणांचे वर्चस्व राहिले आहे. ख्रीश्चानांमधील जे प्रभावी नेते आहेत ते देखील पूर्वाश्रमीचे ब्राह्मण आहेत. भाजपने ख्रिश्चन विरोधी प्रचार गोव्यात फार पूर्वीपासून चालविलेला आहे. गोवा हि संघाची प्रयोगशाळाच आहे. त्यांच्या पक्षाची सत्ता असताना त्यांनी शिक्षण क्षेत्र काबीज केले आहे. शिक्षण क्षेत्रात ते हिंदुत्वाचा विचार रुजावितात. पूर्वी गोवा हे धार्मिक सलोख्याचे आदर्श राज्य मानले जायचे. द्वेषमुलक प्रचारामुळे त्यात आता बदल झाला आहे. शिवाय कोन्ग्रेस च्या नेत्यांची प्रतिमा भ्रष्टाचाराने कलंकित झालेली आहे. कोन्ग्रेस चे माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव हि व्यक्ती डॉन आहे हे सर्वांना ठावूक आहे. कोन्ग्रेस ला राजे राजवाडे आणि डॉन, भ्रष्टाचारी यांचा त्याग केल्याशिवाय फार भवितव्य नाही.

उत्तरखंड मध्ये जेथे साधू, संत, बाबा, महाराज यांचा ज्या भागात प्रभाव आहे तेथे भाजपचे मतदान वाढलेले दिसते.  योग गुरु बाबा रामदेव हे त्याच भागातले. परंतु तेही गढवाल व हिमालयाच्या कुशीत राहणाऱ्या लोकांनी कॉंग्रेसला मतदान केलेले दिसते. 

या निवडणुकीचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर निशिचीतच होणार. सपा व कोन्गेस राजकीय दृष्ट्या एकत्र आले तर स्थिर केंद्र सरकार तयार होऊ शकते. संपूर्ण भारतावर आपलेच राज्य असावे हा विचार कोन्ग्रेस ला सोडून द्यावा लागणार. भगवान गौतम बुद्धापासून भारतीय राजकारणाचा दाखला असा आले कि, डावीकडे झुकलेल्या मध्यम मार्गाने जो राजकीय वाटचाल करील तोच यशस्वी होईल. जेह्वा कोन्ग्रेस संरंजामदार वा भांडवलदारांकडे झुकलेली असेल तेंवा ती यशस्वी होऊ शकणार नाही. 

Saturday 25 February 2012

परिवर्तनवादी युवक संमेलनाचे आग्रहपूर्वक निमंत्रण


माझ्या प्रिय मित्रांनो,

आज बर्‍यात कालावधीनंतर आपल्याशी संवाद साधत आहे. अनेक कामांमध्ये व्यग‘ होतो. आज सर्व मित्रांना अत्यंत आग‘हाचे निमंत्रण देत आहे. रविवार दिनांक २६ फेब्रुवारी २०१२ रोजी, सकाळी १० ते सायं. ०५ या वेळात परिवर्तनवादी युवक संमेलन आयोजित केले आहे. स्थळः महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, गांधीभवन परिसर, कोथरूड, पुणे.

माझे आपणा सर्वांना आवाहन आहे की, आपण मोठ्या सं‘येने या कार्यक‘मास उपस्थित रहावे. यामागील माझी भुमिका येथे देत आहे.
गेल्या काही वर्षांपासून राजकीय क्षेत्रात रोज घसरण चालू आहे. भ‘ष्टाचारी व गुंड माणसांनी राजकीय पक्षांचा ताबा घेतला आहे. राजकीय नेत्यांचा हा भ‘म आहे की ते गुंडांना मुठीत ठेवत आहेत. वास्तविक परिस्थिती उलटी आहे. ते त्यांना आज ना उद्या कळून येईल पण तो पर्यंत वेळ गेलेली असेल. यावर उपाय एकच आहे, तो म्हणजे समाजातील सत्याग‘ही शक्तीचे जोमाने संघटन करणे आणि तरूणांच्या उर्जेला योग्य दिशेने वळन लावणे. काही महिन्यांपासून अण्णा हजारे यांचा बोलबाला वाढला त्यामुळे समाज बदलतोय असा आभासही झाला. तरूण रस्त्यावर आले. पण ऐवढे मोठे आंदोलन कालांतराने भुसभुसीत ठरले. त्यामुळे जनतेमध्ये घोर निराशा पसरली. हे होणारच होते असे मी अनेक प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगत होतो. युक्रांदने बरीच सत्याग‘ही आंदोलने केली. त्यापैकी प्रत्येक आंदोलनात यश मिळाले. त्यावरून युक्रांद या संघटनेजवळ सत्याग‘ही जनआंदोलनाचे संचित किती असेल याचा आपण अंदाज घेवू शकता. मला स्वतः ला सत्याग‘ही आंदोलनात ३८ वेळा अटक झाली. कधी १ दिवसाचा तर दीड दोन वर्षाचा कारावास भोगावा लागला. कधी ना कधी, कोणत्या तरी सत्याग‘हात अटक झालेले सुमारे एक लाख युक‘ांदिय महाराष्ट्रात आहेत. म्हणून माझी अशी धारणा आहे की, समाज व्यवस्थेत परिवर्तन करण्यासाठी तरूणांची उर्जा गोळा करावी आणि तिला सत्याग‘ही जनआंदोलनाची माहिती द्यावी. गेल्या ४८ वर्षाच्या सार्वजनिक जीवनात ज्याला राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या विचारांचा स्पर्श झाला नाही असा माणूस राजकीयदृष्टया बरोबर असू शकत नाही असा अनुभव आला आहे. मग गांधींना तरूणांकडे का नेऊ नये असा मला प्रश्‍न पडला.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी या संस्थेचा मी गेल्या पाच वर्षांपासून अध्यक्ष आहे. ही महाराष्ट्रातील गांधीवाद्यांची थोरली संस्था आहे. त्यामुळे प्रयोग करून त्यातून निष्कर्ष काढून समस्त गांधीवाद्यांचे त्यावर एकमत घडवून आणणे ही माझ्यावर नैतीक जबाबदारी आहे. माझे असे मत झाले आहे की, तरूणांनी खादी घालावी की न घालावी, चहा प्यावा की न प्यावा हे प्रश्‍न अत्यंत गौण असून त्यांनी सत्य, अहिंसा व प्रामाणिकणाची कास धरावी की नाही हा खरा वर्तमानकाळातील ऐरणीवरचा प्रश्‍न आहे. राष्ट्रपित्याने एवढे विचारधन आपल्याला दिले आहे आणि आपल्या आचरणाने आपल्यात बिंबविले आहेत. त्याचा विचार करून प्रचलित परिस्थितीवर उपाय काढता येतो.
लोकनायक हे युक्रांदचे फिलोसोफर व मार्गदर्शक होते. ते नेहमी सांगत की, लोखंड तापविले तरच त्याला नवा आकार देता येतो. देश तापविणे म्हणजे तरूणांना भ‘ष्टाचार आणि अन्यायाविरूध्द संघर्ष करण्यासाठी प्ररित करणे. आताची तरूण पिढी खूपच हुशार आहे. तिला आंतरराष्ट्रीय दृष्टीकोण आहे. तिच्या संवाद संपर्काची साधणे प्रचंड सं‘येने आहेत. पण त्यांना पोकळ बुध्दीचे ठेवून आपल्या स्वार्थासाठी त्यांचा वापर करण्याचा धंदाही जोरात चालू आहे. परिवर्तनवादी युवकांचे संमेलन घेतल्याने पुढील गोष्टी सङ्गल होतील अशी अपेक्षा व आशा आहे.
०१. गडचिरोली ते कोल्हापूर, विदर्भ, मराठरावाडा, पश्‍चिम महाराष्ट्र व कोकण या विभागातील तरूणांचा एकमेकांशी संपर्क आला व त्यांचा संवाद सुरू झाला तर त्यांचे आत्मबल वाढेल.
०२. या प्रयत्नातून एक लाख सत्यवादी व अहिंसावादी तरूणांची डिरेक्टरी तयार करावयाची आहे. त्याचा उपयोग महाराष्ट्रातील सर्व प्रामाणिक नागरिकांना करता येईल. त्यामुळे महाराष्ट्रावर पसरलेले निराशेचे सावट दूर होईल.
०३. राष्ट्रपित्याच्या महानतेचे मर्म आकलन करण्याची तरूणांची शक्ती वाढेल.

तरी माझे आपणास कळकळीचे आवाहन आहे की, आपण रविवार दिनांक २६ फेब्रुवारी 2012 रोजी गांधीभवन, कोथरूड येथे आयोजित केलेल्या परिवर्तनवादी युवक संमेलनास अवश्य उपस्थित रहावे. आपली उपस्थिती हेच आमचे आत्मबळ!

आपला,

डॉ. कुमार सप्तर्षी