Tuesday 18 October 2011

अरविंद केजरीवाल यांना केलेल्या मारहाणीचा निषेध



आण्णा हजारे यांच्या सहकार्यांच्या टीम मधील अत्यंत महत्वाचे मा. अरविंद केजरीवाल यांना ते पत्रकार परिषद घेत असताना कोणा एका तरुणाने चप्पल फेकून मारली. त्या तरुणाला पोलिसांनी पकडले. प्रथम मी युवक क्रांती दल आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांच्या तर्फे अध्यक्ष या नात्याने निषेध करतो. केजरीवाल आणि त्यांचे वक्तव्य कोणाला आवडत असेल व नसेल तरी त्यांच्यावर चप्पल फेकण्याचा अधिकार कोणालाही नाही. या घटना लोकशाही प्रणालीला दुर्बल बनवीत आहेत. असे का घडत आहे याचा विचार केला तर विविध उत्तरे मिळतात. एकतर, 'टीम - आण्णा यांचा अहंकार इतका वाढला होता कि, सर्व देशाचे, १२० कोटी भारतीय जनतेचे ते प्रतिनिधित्व करतात असा त्यांचा दावा सुरु झाला होता. 'आण्णा संसदेपेक्षा श्रेष्ठ आहेत.' आण्णा म्हणजेच भारत, 'म. गांधीच्या नेतृत्वाखाली झालेल्या स्वातंत्र्य लढ्यापेक्षा, डॉ. लोहिया आणि डॉ. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनापेक्षा आण्णा यांचे आंदोलन आगळे वेगळे आहे असा दावा हि मंडळी करीत होती. या देशाच्या इतिहासातून, स्वातंत्र्य संग्राम, जे पी आंदोलन हे सारे पुसून टाकण्याचा हा प्रयत्न मुळात अघोरी होता. जणू आण्णा हजारे हे देशाचे राष्ट्रपिता आहेत, आणि त्यांच्या पासून भारत नावाचे राष्ट्र उदयाला आले. असा भन्नाट दावा केला जात होता. यामागे हिंदुराष्ट्र या संकल्पनेचा प्रभाव उघडपणे दिसत होता. त्यांना म गांधी आणि त्यांची विचारसरणी पुसून टाकायची आहे. खोटा इतिहास लिहिणे आणि खरा इतिहास पुसून टाकणे हा खास मनुवादी डावपेच आहे. टीम - आण्णा बरोबर "राळेगण ब्रिगेड' ही प्रचंड वैचारिक धुमाकूळ घालत होती. आण्णा राळेगण चे महात्मा ठरले हे ग्रामपंचायतीच्या एका ठरावाने. या घटनेपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील ४४००० गावातील पारंपारिक पाटील वतनदार ठराव करून त्या त्या गावचे महात्मे म्हणून मिरवू लागतील. गाव गणना महात्म्याचे पिक तरारून येईल. या सार्या गोष्टी इतक्या बेताल होण्याचे कारण रामलीला मैदानावरील यश या टीम च्या डोक्यात घुसले होते. या प्रकारात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, यांच्या पैकी एकालाही संघटना बांधण्याचा खटाटोप करावयाचा नाही. जेन्वा संघटना हा आधार नसतो आणि केवळ प्रसार माध्यमे हाच आधार असतो तेंवा जेधे प्रसार माध्यमे बसली आहेत तेथे या मंडळीवर हल्ले होणार, हे गैर असले तर असे घडणार याची कल्पना येत होती.

जगात अनेकांना अग्निदिव्यातून जावे लागले आहे, जावे लागत आहे. सोने तेजाब नावाच्या भयंकर असिड मध्ये घालतात आणि त्यात त्याची घात झाली नाही तर त्यास १०० नंबरी सोने म्हणतात. आण्णा - टीम यांना अग्निदिव्यातून जावे लागणार आहे. त्यांना तेजाब मध्ये टाकले जाईल तेंवा ते उजळून बाहेर आले तर त्यांना भारताच्या इतिहासात उजळ स्थान मिळेल. पण जर त्यांच्यात घट झाली तर इतिहासाची चक्रे उलट्या दिशेने फिरू लागतात. म. गांधी पुसण्यासाठी राळेगण नावाचे केंद्र उभे करण्यात आले आहे. गांधींच्या साबरमती व वर्धा येथील आश्रमाला गौणत्व यावे यासाठी हा प्रयत्न असावा याची शक्यता नाकारता येत नाही. 

केवळ अहिंसा हा सत्याग्रहाचा पुरावा नाही. सत्याग्रहाच्या पोटात अहिंसा असतेच. पण सत्याग्रहाला अहंकार, वैरत्व, आक्रमकता या गोष्टींचे वावडे असते. स्पर्धा, वैर हे व्यापारी गुण आहेत; पण त्याला अहिंसेची व गोड बोलण्याची जोड असते. व्यापार्यांना धंद्याला हिंसा मारक व अहिंसा पोषक असते हे समीकरण कळते. गांधीजीनी सागीतालेली अहिंसा हि निर्वैरता, अहंकार मुक्तता या अन्य गुणांशी अविभाज्यपणे जोडलेली आहे. जर रामलीला मैदानावर अहिंसा श्रद्धेचा विषय म्हणून सांगितली असती तर आताचे प्रकार घडले नसते. महात्मा गांधी यांच्या छत्र छायेखाली शहीद भगत सिंग यांचे नाव घेऊन हिंसेचे समर्थन करणे हा प्रकार अजब होता. टीम- आण्णा यांच्या सभासदांवर जे हल्ले होत आहेत. त्या मागे कोन्ग्रेस आहे कि भाजप आहे ? असा प्रश्न विचारला जातो. या प्रश्नाचे उत्तर यामागे दोघेही असू शकतात असे आहे. श्रीराम सेनेने प्रशांत भूषण यांच्यावर मुस्लीम विरोधी भावनेतून हल्ला केला असेल आणि केजरीवाल कोन्ग्रेस च्या विरोधात फार बोलतात म्हणून त्यांच्यावर हल्ला केला असेल. तसेच ज्या टीम मध्ये नेमकी कोणतीही ठाम वैचारिक भूमिका नसते, तिथे प्रतिगामी आणि पुरोगामी यांचा प्रवेश होतो आणि कालांतराने अंतर्गत संघर्ष अपरिहार्य ठरतो. त्या अवस्थेमधून रामलीला मैदानावरील जन आंदोलन जात आहे. या राम लीलेमागे नेमका कोणता प्रभू आहे याचे नेमके उत्तर भविष्यात कळू शकेल. 

1 comment: