Tuesday, 31 December 2013

‘आप’ : सूर्य की धूमकेतू

गेला महिना अनेक घटनांनी भरगच्च भरलेला होता. पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. त्यावरून राजकीय वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत याचा अंदाज येतो. या निवडणुकीत दिल्ली राज्यात अनपेक्षित राजकीय घटना घडली. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमीया नव्या पक्षाचा उदय झाला. या पक्षाने कॉंग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांना नाकारून अलग भूमिका घेतली. तसेच त्यांनी या दोन्ही पक्षांची राजकीय संस्कृतीदेखील नाकारली. आम आदमी पक्षाला ७० पैकी २८ जागा मिळाल्या. या पक्षाला लाभलेल्या घवघवीत यशामुळे भारतीय राजकारणाला नवे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


४६ वर्षांपासून भारतीय संसदेत अडगळीत पडलेले लोकपाल बील लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात संमत झाले. लोकपाल ही संस्था कायद्याच्या बळावर भ्रष्टाचाराला वेसण घालील अशी अपेक्षा आहे.

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या कुणी व का केली हे चार महिने उलटून गेले तरी अजूनही गूढच आहे. महाराष्ट्र सरकारने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात जादूटोणा विरोधी कायदा संमत करून डॉ. दाभोळकरांना श्रद्धांजली वाहिली आहे. अशा प्रकारचा अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदा पास करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले व एकमेव राज्य आहे.

अमेरिकेतील भारतीय वकिलातीत वरिष्ठ सनदी अधिकारी म्हणून सौ. देवयानी खोब्रागडे काम करतात. त्यांना त्या देशात अटक झाली. अमेरिकेच्या काही कायद्यांचा त्यांच्या हातून भंग झालाय. त्यांच्यावर खटला होऊच नये यासाठी भारत सरकारने त्यांची बदली तातडीने युनोमध्ये केली आहे. त्यामुळे आता त्यांची सुटका होईल. तरी त्यांना अमेरिकेच्या कायद्यामधून सवलत मिळेल असे दिसत नाही. घरकामाच्या मोलकरणीला कमी पगारात राबवून घेणे हा अमेरिकन कायद्याप्रमाणे गुन्हा समजला जातो. नऊ डॉलर प्रतितास या हिशोबाने किमान पगार देणे बंधनकारक आहे. तसा पगार दिला तर देवयानी खोब्रागडे यांना आपला सर्व पगार फक्त मोलकरणीवर खर्च करावा लागेल. त्यांनी त्यांच्या घरी काम करणारी मोलकरीण संगीता रिचर्ड ही आपल्या कुटुंबाची सदस्य आहे असे प्रतिज्ञापत्र देऊन तिचा व्हिसा मिळवला होता. शासनाला खोटी कागदपत्रे सादर करणे हा अमेरिकेमध्ये गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे खोब्रागडेंना अटक झाली. या प्रकरणात भारताची अस्मिता दुखावली. अमेरिकेला धडा शिकवावा अशी मागणी भाजपने केली आहे. भाजपची एक विचित्र खोड आहे. प्रत्येक गोष्टीला ते शौर्य आणि षंढत्व अशा तराजूच्या दोन पारड्यातच मोजतात. जणू भाजपचे केंद्र सरकार असते तर त्यांनी अमेरिकेवर हल्ला केला असता अन कमांडोंमार्फत तुरुंग फोडून देवयानीला  भारतात आणले असते. अटलबिहारींच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणित रालोआ आघाडीचे केंद्र सरकार होते. तेव्हा पाकिस्तानबरोबर आरपारची लढाई करण्यासाठी सरहद्दीवर सारे लष्कर पाठविले होते. पण प्रत्यक्षात काय घडले? सहा महिने सरहद्दीवर मुक्काम झाल्यानंतर भारतीय लष्कराला अटलजींच्या सरकारने माघारी बोलावले. सरकार कधी शूर किंवा कधी षंढ नसते. परिस्थितीनुसार त्याला निर्णय घ्यावे लागतात.

 महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आदर्श सोसायटीच्या गृहनिर्माणाबाबत झालेल्या घोटाळ्याचा अहवाल मांडण्यात आला. मात्र, या अहवालावर चर्चा झाली नाही. कॉंग्रेस पक्षाच्या पाच माजी मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचाराचा आदर्श डोंगर उभा करण्यासाठी आपल्या परीने योगदान दिले आहे, असे अहवालात म्हटले आहे. कोणताही अहवाल स्वीकारायचा की नाकारायचा हा सरकारला घटनादत्त अधिकार आहे. मंत्रिमंडळाने  आपल्या अधिकाराचा वापर करून हा अहवाल फेटाळला आहे. त्यामुळे अहवालातून जे गैरव्यवहार सिद्ध झाले किंवा ज्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला, त्यांच्यावर सरकार कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही हे नक्की झाले. चौकशी अहवाल झाल्यामुळे आदर्श घोटाळ्यात कॉंग्रेस पक्षाची अब्रू चव्हाट्यावर आली यात शंका नाही.

द. आफ्रिकेचे गांधी गेले:
दक्षिण आफ्रिकेचे गांधी, माजी अध्यक्ष मा. नेल्सन मंडेला यांचे ५ डिसेंबर रोजी निधन झाले. त्यांना सत्याग्रहीच्या सर्व वाचकांतर्फे मन:पूर्वक श्रद्धांजली !
दक्षिण आफ्रिकेत साडेचारशे वर्षांची गौरवर्णीयांची राजवट होती. स्थानिक आफ्रिकन जनतेला कोणतेही कायदेशीर हक्क नव्हते. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या पर्वात स्थानिक जनतेत स्वातंत्र्याची भावना जागृत झाली. स्थानिक जनता विविध टोळ्यांमध्ये विभागलेली असल्याने त्यांची एकजूट घडणे मुश्किलीचे होते. स्वातंत्र्याची मागणी पुढे रेटण्यासाठी व त्यासाठी संघर्ष संघटित करण्यासाठी आफ्रिकन नॅशनल कॉंग्रेसची स्थापना झाली. टोळ्यांच्या अस्मितांच्या पलिकडे जाऊन द. आफ्रिकेत प्रथमच राष्ट्रीय जाणिवा रुजू लागल्या. संघर्षाच्या या प्रक्रियेतून नेल्सन मंडेला यांचे व्यक्तिमत्त्व आकाराला आले. प्रारंभी, तारुण्यात असताना त्यांचा हिंसेवर विश्‍वास होता. अनेक वेळा त्यांना भूमिगत व्हावे लागले. गोर्‍यांच्या सरकारने त्यांचे कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त केले होते. त्यांच्यावर भरलेल्या खटल्यांमध्ये न्यायालयात ते स्वत:च आपली भूमिका ओजस्वी शब्दांत मांडत. न्यायालयात केलेल्या भाषणांमुळे ते लोकप्रिय झाले आणि त्यागामुळे जनतेच्या मनात त्यांना आदराचे स्थान प्राप्त झाले. त्यांना प्रदीर्घ कारावासाची शिक्षा झाली. सजा भोगल्यानंतर जगभर त्यांच्या सुटकेची मागणी जोर धरू लागल्यानंतर आंतरराष्ट्रीय दबावाखाली २७ वर्षांनंतर त्यांची तुरुंगामधून सुटका झाली. शेवटी ते द. आफ्रिकेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आणि त्यांच्या हातात सत्तेची सूत्रे आली. साडेचारशे वर्षांनंतर वांशिक भेदाच्या पायावर उभी असलेली गोर्‍यांची राजवट कायमची समाप्त झाली.

१८९०-९१ या सालात द. आफ्रिकेत महात्मा गांधी वकिलीचा व्यवसाय करत. गौरवर्णीय सरकारचे स्थानिक भारतीय लोकांवर अत्याचार चालू झाले होते. त्या काळात भारतातून मजूर व छोटे व्यापारी मोठ्या प्रमाणावर द. आफ्रिकेत जात. त्यांच्यावर अत्यंत जाचक निर्बंध लादण्यात आले होते. भारतीयांवरील अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी गांधीजींच्या नेतृत्वाखाली व्यापक चळवळ उभारण्यात आली. गांधीजींनी सातत्याने अहिंसक चळवळीचा प्रचार केला. सुरुवातीला नेल्सन मंडेला यांना गांधीजींची अहिंसा मान्य नव्हती. दुर्दैवाने हिंसा-अहिंसेच्या प्रश्‍नावर अलग भूमिकांमुळे कृष्णवर्णीयांचा मुक्ती लढा आणि भारतीयांचा मुक्तीलढा या दोन चळवळींचा संगम होऊ शकला नाही. कारावासात असताना त्यांचे चिंतन प्रगल्भ झाले. हिंसेवरचा विश्‍वास उडून, त्यांची अहिंसक मार्गावर श्रद्धा बसली. भारताच्या बाहेर स्थानिक अन्यायाविरूद्ध ज्यांनी अहिंसक लढे उभारले, त्यात अमेरिकेतील मार्टिन ल्युथर किंग आणि द. आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यांची नावे इतिहासात ठळकपणे नमूद झाली आहेत.

नेल्सन मंडेला यांच्या सर्वसमावेशकतेच्या तत्त्वविचारसरणीचा खरा विजय झाला तो दक्षिण आफ्रिकेत वंशभेदावर आधारलेल्या राजवटीचा अंत झाला तेव्हा ! आफ्रिकन जनता व गौरवर्णीय सरकार यांच्यामधील संघर्ष पराकोटीला गेल्यावर गौरवर्णीयांचा पराभव झाला. गौरवर्णीय देश सोडून पळून जाऊ लागले. नेल्सन मंडेलांनी त्यांना थोपवले. ते म्हणाले, ‘वंशभेदाच्या राजवटीचा (अपर्थिड) पराभव झाला आहे. हे एकदा सर्वांनी मान्य केल्यानंतर, आता आपण एकमेकांना शत्रू न मानता बंधुभाव व समान दर्जाचे नागरिक बनू या. या पायावर नव्या राष्ट्राची उभारणी करू. तुम्ही गेली ४५० वर्षे म्हणजे अनेक पिढ्या इथे राहात आहात. तुम्ही देश सोडून जाऊ नका, इथेच राहा. आपण एकत्र बसून नवीन राज्यघटना तयार करू.

नेल्सन मंडेला यांच्या शब्दावर विश्‍वास ठेवून गौरवर्णीय तिथेच राहिले. नव्या राष्ट्रासाठी नवी राज्यघटना करण्याचे आव्हान जेव्हा उभे राहिले, तेव्हा त्यांना भारतीय राज्यघटनेचा आधार घेणे भाग पडले. जगात जेवढे म्हणून भेदाभेद असतील ते सर्व भारतात आढळतात. म्हणून वंशभेदाच्या समस्येवर भारताने जे भेदाभेदीवर उत्तर शोधले, ते जगात कोणालाही उपयोगी पडू शकते. अनंत जाती, अनेक भाषा, अनेक चालीरीती अशा अलगपणाच्या अनेक समस्या असताना भारताने सर्वांना एकत्र नांदण्यासाठी एक राज्यघटना तयार केली. त्या राज्यघटनेमधूनच भारतात सगळे कायदे निर्माण होतात. द. आफ्रिकेत अनेक टोळ्या आहेत. शिवाय गौरवर्णीय व कृष्णवर्णीय असा भेदाभेद रुजलेला आहे. त्यांना इतर देशांतील राज्यघटना उपयोगी पडणार नव्हती. भारताच्या राज्यघटनेची सही नक्कल म्हणजे द. आफ्रिकेची राज्यघटना आहे. दोन्ही राज्यघटनेत फक्त एकच फरक आहे. भारतीय राज्यघटनेत जी मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत त्यांच्याकडे भारतीय राजकारण्यांनी कधी गांभीर्याने पाहिलेले नाही. मार्गदर्शक तत्त्वांकडे भारतात झालेले अक्षम्य दुर्लक्ष लक्षात घेऊन द. आफ्रिकेच्या घटनेच्या शिल्पकारांनी मार्गदर्शक तत्त्वे मूलभूत अधिकारात समाविष्ट केली आहेत.

भारतीय स्वातंत्र्य लढा आगळ्यावेगळ्या पद्धतीने महात्मा गांधींनी चालविला. तोपर्यंत मानवी इतिहासाची साक्ष पाहिल्यास युद्धात जो पराभूत होतो त्याला आपला जीव गमवावा लागायचा अथवा पलायन करून जीवाचा बचाव करावा लागायचा. भारतात इंग्रज पराभूत झाले तरीही त्यांच्यावर हल्ले झाले नाहीत, रक्तपात झाला नाही. त्यांना सन्मानाने मायदेशी परत जाता आले. या घटनेचा नेल्सन मंडेला यांच्या मनावर खोल परिणाम झाला होता. गौरवर्णीयांबरोबर रक्तरंजित संघर्ष झाला असला, तरी त्यांनी गौरवर्णीयांना अभय दिले आणि देशातच सन्मानाने राहण्याचे आवाहन केले. नेल्सन मंडेला कायद्याचे राज्य या संकल्पनेला निष्ठावंत होते. स्वातंत्र्यलढ्यात त्यांची साथी व प्रेयसी आणि नंतर पत्नी झालेली विनी मंडेला एका खुनाच्या खटल्यात सापडली. नेल्सन मंडेला राष्ट्राध्यक्ष असूनही विनीला कारावास घडला. मंडेलांनी तिला कायद्यापासून संरक्षण दिले नाही. उलटपक्षी तिच्याबरोबर त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांच्या तुलनेत भारतीय नेते किती वेगळे वाटतात? आपली मुले-बाळे, गणगोत, नातेवाईक यांच्यासाठी कायदा नगण्य करण्याकडेच त्यांचा कल असतो. सत्तेत असताना आणि लोकप्रियतेच्या लाटेवर आरुढ असताना नेल्सन मंडेला यांनी समाधानाने निवृत्ती पत्करली. ही मानसिकता विशेष म्हणावी लागेल. भारतात जे घडते ते पाहून तर ते वैशिष्ट्य ठळकपणे लक्षात येते. द्रमुकचे नेते करुणानिधी यांच्याकडे पाहा. शरीर विकलांग झाले तरी भारतीय पुढार्‍यांमध्ये सत्तेचे पद सोडण्याची इच्छा होत नाही. नेल्सन मंडेला यांचे स्मरण भविष्यात अनंतकाळ केले जाईल. मानवतेची मूल्ये जे आचरणात आणतात त्यांचे स्मरण करणे म्हणजे या पृथ्वीवर मानवाचे अस्तित्व टिकून राहावे असे मानणे होय.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका:
 या निवडणुकीला काही विश्‍लेषकांनी मिनी लोकसभा असे म्हटले; पण त्यात फार तथ्य नाही. कारण गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी या राज्यांमध्ये काही काळ आधी विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी याच प्रदर्शनात विधानसभा निवडणुकीपेक्षा लोकसभेला वेगळे निकाल लागले. हा भाजपचे वर्चस्व असलेला टापू आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, दिल्ली या प्रदेशांत सत्तरच्या आसपास लोकसभेच्या जागा आहेत. यात गुजरात राज्यातील लोकसभेच्या बावीस सीट मिळवल्या तर हा मामला नव्वद खासदारांपुरता मर्यादित आहे. या नव्वद -पंचाण्णव जागांपैकी ६०-७० जागा भाजप जिंकेल असे मानू या. तरीही भाजपला केंद्रात सत्ता हस्तगत करण्यासाठी आवश्यक असलेली २७३ खासदारांची संख्या गाठणे सोपे नाही. अन्य राज्यांमध्ये भाजपला खासदारांची संख्या वाढवता येईल असे वातावरण नाही. कॉंग्रेसच्या ताब्यात बारा प्रदेशांत सत्ता आहे. शिवाय हा इतका जुना पक्ष आहे की तो देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचलेला आहे. या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसची पिछेहाट झाली आणि भाजपचे वर्चस्व वाढले.

दिल्लीमध्ये मात्र भाजप व कॉंग्रेस या दोन्ही पक्षांना बाजूला सारून नुकत्याच स्थापन झालेल्या आम आदमी पक्षाने २८ जागा प्राप्त केल्या आणि बर्‍याच मतदारसंघात त्यांना अगदी कमी मताने पराभव स्वीकारावा लागला. ही घटना महत्त्वाची आहे. दिल्ली प्रदेशात भाजपची सत्ता आली असती, तर भाजपची त्सुनामी लाट आली आहे असे म्हणता आले असते. दुर्दैवाने वा सुदैवाने भाजपची लाट किनार्‍यापर्यंत पोचण्याआधीच ओसरली असे म्हणावे लागते. नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची भारतात लाट निर्माण झाली आहे असे त्या पक्षाचे एकूण एक, लहान वा थोर नेते म्हणतात. परंतु त्यांच्या सभांचा परिणाम फक्त राजस्थानमध्ये दिसतो. राजस्थान हा गुजरातच्या शेजारचा प्रदेश आहे. त्यामुळे त्यांचा राजस्थानच्या मतदारांवर परिणाम झाला असे म्हणता येईल. आणखी एक घटक आहे तो म्हणजे राजस्थानमध्ये राजे महाराजांचा संस्थानिकांचा सुळसुळाट आहे. पूर्वी राजेमहाराजांची स्वतंत्र पार्टी या राज्यात सत्तेवर आली होती. इथल्या मतदारांवर सरंजामशाही प्रभाव अजूनही आहे. त्यांना राजेमहाराजे यांचे फॅन बनण्याची खोड आहे. तिथे वसुंधराराजे मुख्यमंत्री बनणार हे मोठे आकर्षण होते.

दिल्लीमध्ये राहुल गांधींच्या सभांना प्रतिसाद मिळाला नाही. तसेच नरेंद्र मोदी यांचाही दिल्लीत प्रभाव पडला नाही. आम आदमी पक्षाला कॉंग्रेसने आपल्या आठ आमदारांचा पाठिंबा दिला. अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री झाले. आपचे सरकार सत्तेवर आले. कॉंग्रेस व भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांमध्ये बर्‍याच बाबतीत साधर्म्य आहे. फरक फक्त सेक्युलॅरिझम व हिंदुत्ववाद एवढ्याच मुद्यापुरता आहे. आपदेशभर वाढेल किंवा संपेल याबद्दल आज कोणी ठामपणे काहीच सांगू शकणार नाही. सध्या त्याचे काम तुरटीच्या खड्यासारखे आहे. राजकारणाचे पाणी खूपच गढूळ झाले आहे. आपसारख्या राजकीय प्रक्रिया या गढूळ पाण्यात मिसळून माती, कचरा तळाला ठेवतील आणि पाण्याला काही प्रमाणात नितळ करतील अशी आशा सर्वांना आहे. हा पक्ष महाराष्ट्रात व गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीत उतरणार अशी बातमी आहे. तसे झाले तर राजकारणाला धार येईल. महाराष्ट्र हा कॉंग्रेसचा आणि गुजरात हा भाजपचा गड आहे. हे दोन्ही गड खिळखिळे करण्याचे काम आप किंवा तत्सम राजकीय प्रक्रिया करू शकतील. महाराष्ट्रात कॉंग्रेसच्या पुढार्‍यांना भ्रष्टाचाराबाबत लज्जा वा संकोच उरलेला दिसत नाही. आदर्श सोसायटीच्या प्रकरणात हे दिसून आले की कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री, सनदी नोकरशहा यांना त्यांचा मलिदा मिळाला की बेकायदेशीर गोष्टींवर सही करून मंजुरी देण्यात त्यांना लाज वाटत नव्हती. भाजप कॉंग्रेसच्या भ्रष्टाचाराविरुद्ध दंड थोपटून उभा आहे. पण त्याचबरोबर त्यांच्या एका आमदाराने या इमारतीत बावीस बेनामी सदनिका घेतल्या आहेत. खरेदीची किंमत आणि बाजारभाव यांच्यात प्रचंड तफावत आहे. कॉंग्रेसच्या पुढार्‍यांची जनतेशी असलेली नाळ जवळपास तुटलेली आहे. दलालांमार्फत जनतेची कामे करायची त्यांना सवय लागलेली आहे. ही दलालशाहीच दोन्ही कॉंग्रेस पक्षांचा बळी घेईल असे दिसते. या मंडळींना ठिकठिकाणी प्रॉपर्टी विकत घेण्याचे व्यसन लागलेले आहे. हा हव्यास त्यांना विनाशाकडे घेऊन जात आहे. याउलट भाजपने गुजरातमध्ये आपला जम बसवला आहे. कॉंग्रेसचे चिमणभाई पटेल मुख्यमंत्री असताना त्यांच्या विरोधात नवनिर्माण आंदोलन झाले. त्या आंदोलनातून हिंदुत्ववादी शक्तींनी डोके वर काढायला प्रथम सुरुवात केली. ते संघप्रणित अ.भा.वि.प. या विद्यार्थी शाखेच्या झुंडीला हिंसक बनविण्याचा प्रयत्न करीत आणि येनकेन प्रकारे इनकम टॅक्स ऑफिस जाळण्यासाठी त्यांचा मोर्चा त्या दिशेने वळविण्याचा प्रयत्न करीत. त्या आंदोलनाचे बारकावे माहीत असण्याचे कारण मी व डॉ. अरुण लिमये नवनिर्माण आंदोलनाच्या काळात अहमदाबादमध्ये मुक्काम ठोकून होतो. त्या आंदोलनामुळे चिमणभाई पटेल यांना राजीनामा द्यावा लागला. कालांतराने चिमणभाई जनता पक्षात आले आणि पुन्हा  ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या काळात गुजरातच्या विकासाला खरी चालना मिळाली. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यावर चिमणभाई पटेलांनी तयार केलेला विकासाचा पाया त्यांना उपयोगी पडला. मोदींना विकासपुरुष हे विशेषण लावण्याचा बीजेपीचा अटोकाट प्रयत्न चालू आहे. त्यामागे गर्भित हेतू हा आहे की, त्यांचे जनमानसात रुजलेले दंगलपुरुषहे विशेषण पुसले जावे.

नमोंची महागर्जना:
नरेंद्र मोदी यांच्या हातात भाजप सोपविण्यात आलाय. तेव्हापासून त्यांच्या प्रचंड गर्दीच्या सभा चालू आहेत. सगळा खर्च व व्यवस्थापन त्यांच्याकडूनच होते. भाजपमधील अन्य नेत्यांचा त्यात सहभाग नसतो. त्यांच्या सभेला गर्दी प्रचंड असते हे मान्य केले तरी त्यांच्या भाषणाला दर्जेदारपणा नसतो. हे कबूल करावे लागते. त्यांचे भाषण शब्दबंबाळ असते. आरोपांचा भडीमार असतो. प्रामाणिकपणापेक्षा सादरीकरणाला महत्त्व असते. २२ डिसेंबर रोजी मुंबईत दुपारी मोठी सभा झाली. व्होट फॉर बीजेपीअशी घोषणा देण्याऐवजी त्यांनी व्होट फॉर इंडियाअशी घोषणा दिली. हीच महागर्जना ! इंदिरा गांधींच्या काळात इंदिरा इज इंडियाअशी घोषणा कॉंग्रेसवाल्यांनी दिली होती. इंडिया म्हणजे भाजप व भाजप म्हणजे इंडिया अशी धारणा या घोषणेमागे असावी. हिटलरही हेच म्हणायचा, ‘मी म्हणजे जर्मनी!’. ‘हल्लाबोलही चळवळीमधील एक दीर्घकाळ चालणारी ठेक्यात म्हणता येणारी विशिष्ट लय असलेली घोषणा आहे. त्या घोषणेच्या धर्तीवर मोदी एक एक गोष्टीचे नाव घ्यायचे आणि स्टेजवर त्यांच्यामागे बसलेले लोक व्होट फॉर इंडियाहे पालुपद म्हणायचे. घोषणांचा हा कार्यक्रम बराच वेळ चालू होता. महागाईमुक्त, गरिबीमुक्त अशा पन्नास घोषणा नरेंद्र मोदींनी दिल्या. कॉंग्रेसमुक्त भारत निर्माण करायचा म्हणजे एवढ्या घोषणा द्याव्याच लागणार. आम्ही बारकाईने त्यांची सभा दूरचित्रवाणीवर ऐकली. नमोंनी दंगलमुक्त भारतअशी घोषणा मात्र दिली नाही. त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी लक्षात आली की हिंदुत्ववादालाही त्यांनी ओझरता स्पर्शदेखील केला नाही. वास्तविक भाजपचे राजकीय चारित्र्यदेखील मशिदी पाडण्याचे व अल्पसंख्यांकांवर हल्ले करण्याचे आहे. काही गोष्टी तात्काळ व जाहीर बोलायच्या असतात आणि काही गोष्टी अनुकूल वेळ येईपर्यंत मनात ठेवायच्या असतात. कॉंग्रेसवर त्यांनी आरोपांची फैर झाडली. जशी एखाद्या समारंभात एक तास वाजणारी फटाक्यांची लड लावतात तसे त्यांचे भाषण होते. भाजपच्या सर्व नेत्यांना बाजूला सारून रा.स्व. संघाने मोदींच्या हातात सर्व सूत्रे दिली. तेव्हापासून भाजपचे शिलेदार आणि भाजपचे सामान्य मावळे कॉंग्रेसवर काहीही आरोप करू लागले आहेत. त्या आरोपांमध्ये तथ्य असतेच असे नाही. आपण  देव आहोत आणि कॉंग्रेसचे लोक दानव आहेत असा भाजपच्या लोकांचा बोलण्याचा थाट असतो. वास्तविक भाजपच्या एका अंगाचे कॉंग्रेसीकरणच झाले आहे. आर्थिक नीतीचे दोघांचेही मॉडेल एकच आहे. दोघांनी खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण मान्य केले आहे. या दोन्ही पक्षांची काही वैशिष्ट्ये मात्र वेगळी आहेत. उदा. कॉंग्रेस पक्ष अल्पसंख्यांकांना जवळ करण्याला अग्रक्रम देतो. भाजप मात्र अल्पसंख्यांकांचा द्वेष शिकवून बहुसंख्यांक हिंदू ही आपली व्होट बँक मानतो. प्रत्यक्षात कॉंग्रेसची सेक्युलर भूमिका भारतीय मतदारांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारात भाजप आपला हिंदुत्ववाद किंवा मशिद पाडण्याचा अभिमान या गोष्टी बाजूला ठेवून कॉंग्रेसने कसा विकास टाळला आणि कॉंग्रेसचे अधुरे काम आम्हीच कसे पूर्ण करू शकतो, या पद्धतीची भाषणबाजी करतात.

सूर्य की धूमकेतू
आम आदमी या पक्षाचा उदय ही अगदी अलीकडची कमी वेळात घडलेली अचानक फिनॉमिना आहे. विलक्षण वेगाने हा पक्ष दिल्लीच्या सत्तेवर प्रस्थापित झाला. याची तुलना फक्त रामायणातील हनुमानाने बालपणी सूर्यावर घेतलेली झेपेबरोबर होऊ शकते. तसे पाहता हा सूर्यही नाही आणि धूमकेतूही नाही. १९८० सालापासून राजकीय क्षेत्रात चारित्र्याची घसरण सुरू झाली. गुन्हेगार व भ्रष्ट मंडळींनी राजकारण, शासकीय यंत्रणा ताब्यात घेतल्या. लोकशाहीला दर पाच वर्षांनी निवडणुका संजीवनी देतात. पण भारतात मात्र प्रत्येक निवडणुकीत लोकशाहीची पिछेहाट होते. भाजपसारख्या धर्माधिष्ठित पक्षाचा बहुसंख्यांकवाद, तसेच प्रादेशिक अस्मितांचाही जोर वाढू लागला. त्यामुळे राष्ट्रीय राजकारण खंडित झाले. कोणत्याच पक्षाला लोकसभेत बहुमत मिळणे अशक्य झाले. त्यामुळे घोडेबाजार, सौदेबाजी, भ्रष्टाचार या प्रवृत्ती वाढीस लागल्या. कोणत्याही पक्षात शिस्त उरली नाही. गुन्हेगारांच्या टोळ्या ज्याप्रमाणे आपला संघटनात्मक ढाचा बनवितात, तसाच संघटनात्मक ढाचा राजकीय पक्षात दिसू लागला आहे. या गैरप्रकारांची मध्यमवर्गात प्रतिक्रिया उमटत होती. ती सुप्त प्रतिक्रिया बोलकी करण्यासाठी काहीतरी निमित्त घडणे आवश्यक होते. आपने हे निमित्त पुरविले. म्हणून अवघ्या एक वर्ष वयाच्या या पक्षाने सत्ता संपादन करण्यात यश मिळविले.
आपच्या यशामुळे काही गोष्टी नक्कीच अधोरेखित झाल्या. प्रामाणिकपणे तुम्ही सामान्य जनतेमध्ये संचार करून तिचे प्रेम प्राप्त करू शकता. ही लोकशाही व्यवस्थेला अत्यंत आश्‍वासक अशी हमी आहे. दुसरा निष्कर्ष असा की लोकांना आपल्या नेत्याचा साधेपणा प्रिय असतो. कॉंग्रेस व भाजपच्या नेत्यांमध्ये सरंजामशाही मनोवृत्ती प्रकट होत होती त्याबद्दलची ही प्रतिक्रिया आहे. पैसा व दारू यांचे वाटप न करताही मतदान मिळू शकते हे या निवडणुकीने दाखविले. बहुमत नसताना या पक्षाने सत्ता संपादन केली. त्यासाठी व्यापक प्रमाणावर जनतेचा कौल प्राप्त केला. काही लोकांना वाटते की आपहा धूमकेतू आहे. कॉंग्रेस पक्षाला धडा शिकविण्याचे ऐतिहासिक कार्य करून हा धूमकेतू अवकाशात नष्ट होणार. काहींना वाटते हा पक्ष निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनांची पूर्ती करू शकणार नाही. आम्हाला मात्र वेगळे वाटते. कॉंग्रेस पाठिंबा काढून घेणार नाही. याचे एक कारण आहे. सध्या देशात कॉंग्रेसविरोधी वातावरण टिपेला गेले आहे. पाठिंबा काढून घेतल्यास कॉंग्रेसविरोधी राजकारण आणखी तापेल. त्याचा फायदा नमो व भाजप यांना होणार. आपच्या सरकारने जनतेचे प्रश्‍न सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला तरच ते लोकप्रिय राहणार. कॉंग्रेसचे केंद्र सरकार निधीची मदत करून त्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळे कॉंग्रेस व आपयांच्यात जवळीक होणार. या नव्या पक्षाची धोरणे आणि कॉंग्रेसचे पारंपरिक धोरण यात फारसा फरक नाही. १९३४ साली कॉंग्रेस पक्षाला दुरुस्त करणारा एक राजकीय गट म्हणून कॉंग्रेसच्या पोटातच कॉंग्रेस समाजवादी पक्षनिर्माण झाला होता. परंतु इतिहासाची पुनरुक्ती जशीतशी होत नसते.

मुजफ्फरनगरची जातीय दंगल:
ही दंगल मुद्दाम घडवून आणण्यात आली आहे, याबाबत आता शंका उरली नाही. ८-१० हजार दंगलग्रस्त लोक निर्वासित छावण्यांमध्ये अजूनही राहत आहेत. त्यापैकी कुणीही आपल्या गावी परतायला तयार नाही. बहुसंख्यांक समाजाचा आक्रमकपणा एकदा जागृत झाला की त्यांच्या क्रौर्याला सीमा नसते. जाटांनी या दंगलीत मुस्लिमांवर एवढे अत्याचार केले की त्या कटू स्मृतीमुळे कुणीही आपल्या गावी जायला तयार नाही. निर्वासितांच्या छावण्यांमध्ये पुरेशा सुविधा नाहीत. प्रदूषित पाणी प्यावे लागते. थंडीपासून बचाव करणे हे कठीण काम बनले आहे. ४००० च्या छावणीमध्ये नुकतीच ३७ बालके हगवण व थंडी यामुळे मृत्यू पावली. जातीद्वेष व धर्मद्वेष यामुळे माणुसकीचा अंत होतो. परधर्माच्या माणसांबद्दल आपुलकी, सहसंवेदना लोप पावते. रस्ते, वीज, पाणी, शाळा या सुविधा आवश्यक आहेतच; पण भारतीय नागरिकांचा बंधुभाव जपणे हे सर्वात मोठे व महत्त्वाचे काम आहे. जो कोणी बंधुभाव नष्ट करेल त्याला सार्वजनिक जीवनात काहीही स्थान असता कामा नये.

No comments:

Post a Comment