Thursday 24 November 2011

शरद पवारांवरील हल्ला: समाजाचे नैतिक अध:पतन होत आहे काय?


शरद पवार यांना हरविंदर सिंग नावाच्या तरुणाने बेसावध अवस्थेत गाठून मारहाण केली. एकदा लोकशाही प्रणालीचा स्वीकार केला कि किमान सभ्यपणा अपेक्षित आहे. हा प्रकार असभ्य व रानटी आहे. शरद पवार त्यावेळी सावध असते तर त्या तरुणाने हल्ला करण्याचे धाडस केले नसते. म्हणून हा भ्याड हल्ला आहे. याच तरुणाने सुखराम यांच्यावरही हल्ला केला होता. मानसशास्त्राच्या दृष्टीने सामाजिक घटनांची अशी वैयक्तिक प्रतिक्रिया संभवत नाही. कदाचित या माणसाच्या मागे काही षडयंत्र रचणारी माणसे असू शकतात. मी प्रकारचा तीव्र निषेध करतो. कालच प्रसार माध्यमांच्या वाहिन्यांवर बोलताना मी म्हणालो होतो कि, 'दारू सोडण्यासाठी बदडून काढणे आणि पुन्हा नाकावर टिच्चून सांगणे कि ३० वर्षापूर्वी मी ज्यांना बदडले ते आज माझे उपकार मानतात. अन्यथा माझ्या आयुष्याचे वाट्टोळे झाले असते असे ते मला सांगतात' हे अण्णा हजारे यांनी सांगणे गैर आहे. परत अण्णा असे म्हणतात कि, 'मी मातृभावानेने लोकांना बदडत होतो.' अशी भूमिका असणार्यांना प्रतीगांधी हि मान्यता मिळावी हे देशाचे दुर्दैव आहे. हेच अण्णा हजारे शरद पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देतांना फारच कुत्सित बोलले. ते असे म्हणाले कि, 'एकाच थप्पड मारली का?' म्हणजे अधिक थपडा मारायला पाहिजे होत्या अशी त्यांची अपेक्षा होती असे दिसते. 

काल मी अंदाज व्यक्त केला होता कि, जे दारूचे व्यसन सोडण्यासाठी मद्य प्रश्न करणाऱ्यांना बदडून काढण्याचा विचार मांडतात त्यांच्या मनात भ्रष्टाचारी माणसांना बदडून काढावे असाही विचार मूळ धरू लागेल. मग बदडून काढण्याची लाट येईल. मग हुकुमशाही व गुंड प्रवृत्तीचे म्हणू लागतील कि "तो अमुक आमुक दारुड्या होता किंवा भ्रष्टाचारी होता म्हणून आम्ही त्यांना बदडून काढले" हि भूमिका मुळातच विकृत आहे. 

शरद पवार हे माझे ५१ -५२ वर्षापासुनचे मित्र आहेत. त्यामुळे राजकीय घटनेपेक्षा आपल्या मित्राला अश्या प्रसंगाला तोंड द्यावे लागले याचे वाईट वाटले. विशेषता त्यांच्या आजाराच्या जागेवर आघात करण्यात आला. हे तर फारच गंभीर आहे. आम्ही राजकारणात एकमेकांच्या विरोधी भूमिका घेत असलो तरी आमच्या वैयक्तिक आपुलकी मध्ये अंतर पडलेले नाही. ७  वर्षांपूर्वी माझ्या घरावर, मी घरी नसताना बुरखाधारी सशत्र तरुणांनी जबरदस्तीने घरातल्या फर्निचर ची मोडतोड केली. माझ्या मुलाच्या शरीराला चाकू लावून हि राडेबाजी त्यांनी केली होती. त्या प्रसंगानंतर शरद पवारांचा फोन आला होता. मुख्यमंत्री सुशीलकुमार आणि छगन भुजबळ भेट द्यायला आहे होते. दीड वर्ष महाराष्ट्र सरकार तर्फे दोन सशत्र पोलिसांचे संरक्षण देण्यात आले होते. माझ्यासारख्या लहान माणसाच्या घरावर राजकीय भूमिकेखातर हल्ले होतात आणि शासन संरक्षणही देते. शरद पवार हे माझ्या तुलनेने महान राजकीय व्यक्तिमत्व आहे. म्हणून हा प्रकार फारच गंभीर वाटतो. कुणीतरी, कोणालातरी सार्वजनिक जीवनातून बाहेर फेकण्यासाठी षडयंत्र रचत आहे असा भास होतो. 

१९७८ साली शरद पवार पुलोद आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री झाले. त्यावेळी मी जनता पक्षाचा आमदार होतो. आमचे राजकीय मेतकुट जमले होते. शरद पवारांनी कोन्ग्रेस व वसंत दादांशी गद्दारी केल्याचा राग इंदिरा कोन्ग्रेस च्या लोकांना आला होतो. कोन्ग्रेस चे भंडारा जिल्ह्यातील एक आमदार सुभाष कारेमोरे यांनी विधान सभेचे कामकाज चालू असताना 'गद्दार.. गद्दार ..' अशा घोषणा देवून शरद पवारांना चप्पल फेकून मारली होती. त्या प्रसंगाचा आम्ही सर्वांनी निषेध केला होता. मला वैयक्तिक दुख: झाले होते. त्या प्रसंगात शरद पवार त्यांची मनशांती ढळलेली नाही असे दाखवत होते. तथापि वरून तसे दाखवत असले तरी त्यांना अंतकरणात जखम झालेली होती. सार्वजनिक जीवनात वावरताना अशा गोष्टींना सामोरे जावे लागले कि, साहजिकच कोणाच्याही मनात विचार येतो कि आपण समाजकार्य का करावे? आपण एका व्यक्तीला नकोसे झाले आहोत कि संपूर्ण समाजाला नकोसे झालो आहोत असा मनात संभ्रम निर्माण होतो. त्यावेळी शरद पवार यांचे वय ३८ वर्षांचे होते. आज ते ७२ वर्षाचे आहे. भारतीय संस्कृतीत वयोजेष्ठतेला अपार महत्व आहे. मग सुखराम यांच्या सारख्या ८० वर्षाच्या नेत्याला मारहाण का झाली? समाजाची संस्कृती अवनत होत चालली आहे काय? असे अनंत प्रश्नाचे भोवरे मनात तयार होतात. कदाचित भविष्यकाळात जेष्ठ पुढार्यांना मारहाण करून नाउमेद व निरुत्साही करणे अशा प्रकारची लाट येण्याची शक्यता आहे. म. गांधी यांच्या सारख्या ७९ वर्षाच्या वृद्ध माणसाला गोळ्या घालण्यात फार मोठे शोर्य होते असे मानणारे नथुराम वादी मंडळी अजूनही समाजात आहेत. सुखराम यांना ज्यावेळी तरुणाने मारले त्यावेळी येवढा निषेध झाला नाही. म्हणून त्याने पुन्हा शरद पवारांना मारून प्रसिद्धी मिळवली. या प्रकारची चटक विविध पक्षातील तरुणांना नक्की लागेल. तुरुनांच्या वयोगटाला वाह्यात नेते प्रियच असतात. असेच एक वाह्यात नेते राज ठाकरे म्हणाले कि, 'शरद पवारांना कशाला मारले' शरद पवार मराठी आहेत म्हणून राज ठाकरेंना आदरणीय वाटतात. ते पुढे म्हणाले कि. 'पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाच मारायला हवे होते.' इंदिरा कोन्ग्रेस चे लोक उद्या राज ठाकरे यांना मारण्यासाठी बक्षीस लावतील. हा खेळ चालू करून या देशाचे वाट्टोळे करण्यासाठी सर्वांनी चंग बांधलेला दिसतो. 

राष्ट्रवादी कोन्ग्रेस या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राडेबाजीचे बजीचे नाटक सुरु केले आहे. कारण सध्या महापालिकेच्या निवडणुकीच्या तिकिटाच्या मागणीचा मोसम सुरु आहे. साहेबांवरील हल्ल्यामुळे त्यांना झळकून घेण्याची, निष्ठेचे प्रदर्शन करण्याची ऐतीच नामी संधी प्राप्त झाली आहे. आर आर पाटील यांना तर मोठ्या व छोट्या या दोन्ही साहेबाना निष्टा दाखविण्यासाठी पोलिसांना निष्क्रिय राहण्याचा आदेश दिला आहे असे दिसते. नेमका असाच आदेश नरेंद्र मोदी यांनी गुजरात दंगली मध्ये दिला होता "... तीन दिवस निष्क्रिय राहा..!' तसाच हा प्रकार आहे. पोलिसांची निष्क्रियता पाहून अनेक भ्याड लोकांना शौर्य दाखविण्याची उबळ आलेली दिसली. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कोणाचा निषेध करणार कोणावर दगड फेकणार आणि कोणाच्या गोष्टी जाळणार. दिल्ली मध्ये केंद्र सरकार मध्ये आणि महाराष्ट्रातही ते सत्तेत आहेत. रस्ता रोको हा प्रकार शासनाच्या विरोधासाठी करतात. बस जळतात ते हि शासनाच्या निषेधासाठी. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना फक्त उपोषण करून सुताकामध्ये राहण्याचा नैतिक अधिकार आहे. रस्त्यावर येवून जनतेला त्रास देण्याचा अधिकार नाही. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे नुकसान करतील त्याची भरपाई त्यांनी दिली पाहिजे. ज्यांनी स्वतंत्र लढ्यात भाग घेतला त्यांना स्वातंत्र्यानंतर मंत्री पदे मिळाली. जय प्रकाश नारायण यांच्या आणीबाणी च्या आंदोलनात जे लोक कारावासात गेले त्यांनाच पक्षाने तिकिटे दिली. तसे राष्ट्रवादी करणार आहे काय..? शरद पवारांना झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणजे स्वातंत्र्य आंदोलन किंवा जे पी यांची चळवळ नाही. 

पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मी निषेध व संताप व्यक्त करतो!

1 comment:

  1. Sharad Pawaranvaril halla atyant nindaniya ahe. Pawarshebanchya karyashailibaddal matbhed asu shakatat parantu tyani CM astana ghetlele nirnay atyant purogami hote.
    Ya prakarabat kahi gambhir mudde - 1) Jya vyaktine magachya athavdyat Sukhram yanchyavar halla kela ti ya sahitya samarambhat kashi yeu shakali? Rajdhanitil Suraksha vyavastha evadhi takladu kashi? 2)Bhampak electronic mediane mothe kelele ? Dusare Gandhi Anna hazare yani ji muktaphale udhali tyatun janata ata tari kahi bodh ghenar ki nahi ?

    ReplyDelete