Friday 14 October 2011

प्रतीगाम्यांची झुंडशाही आणि विचारवंतांची अपूर्णता



प्रशांत भूषण यांना १२ ऑक्टोबर रोजी त्यांच्या चेंबर मध्ये मारहाण करण्यात आली. दुसर्या दिवशी पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये त्यांच्या अनुयायांना मारहाण करण्यात आली. मारहाण करणाऱ्या श्रीराम सेनेचे म्हणणे आहे कि प्रशांत भूषण यांनी काश्मीर बद्दल घेतलेली भूमिका त्यांना मान्य नाही. लोकशाही व्यवस्थेचा गाभा हा आहे कि त्यात प्रत्येक व्यक्तीला विचार करण्याचे आणि तो विचार इतरांना सांगण्याचे स्वातंत्र्य असणे. विचार स्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्य या शिवाय व्यक्तीचे स्वातंत्र्य अपूर्ण आहे. लोकशाहीत डोक्यातले विचार बदलायचे असतात, डोकी फोडायची नसतात. ज्यांना आपले विचार इतरांना पटवून देण्याची क्षमता नसते आणि ज्यांच्या मेंदूला भिन्न विचार ऐकण्याची सवय नसते तेच लोक अशा प्रकारे झुंड शाही करतात. नागरिकांची विवेकशक्ती हा लोकशाहीचा पाया आहे. काही भारतीय नागरिकांना भारतीय संविधान, त्याने दिलेले सर्वांना समान दर्ज्याचे स्थान हेच मान्य नाही. हि मंडळी भूतकाळात मनाने वावरतात. त्यांना भारत नावाचे आधुनिक राष्ट्र, या नवोदित राष्ट्राने स्वीकारलेली लोकशाही प्रणाली, सर्व नागरिकांचा समान दर्जा, स्त्री - पृरुश समानता या गोष्टी अमान्य आहेत. या गोष्ठी व त्याच्या पाठीशी असलेली जीवन मुल्ये - म्हणजे श्रेणीबद्ध समाजरचना, अश्पृश्यता, स्त्रियांची गुलामी, अंधश्रद्धा - पुन्हा प्रस्थापित करून प्राचीन समाज रचना आणायची आहे. या प्रक्रियेला प्रतिक्रांती असे म्हणतात. प्रतीक्रांतीकारकला विवेक शुण्यातेची साधना करावी लागते. विवेक शून्य माणसे एकत्र झाली कि झुंड शाही निर्माण होते. श्रीराम सेनेच्या या भ्याड कृत्याचा मी व्यक्तिश: व युवक क्रांती दलाचा अध्यक्ष व महाराष्ट्र गांधी स्मारक निधी चा अध्यक्ष या नात्याने तीव्र निषेध करीत आहे. तसेच सर्व सामान्यांनी चौकात, मित्रांबारोबारील गप्पांमध्ये, कार्यालयात, हॉटेल मध्ये चहा पितांना, प्राध्यापकांनी स्टाफ रूम मध्ये या कृत्याचा निषेध अभिव्यक्त केला पाहिजे. पोलिटिकली करेक्ट अशी भूमिका यत्र - तत्र व सर्वत्र व तिन्ही त्रिकाळ घेणे हि लोकशाहीला बळकट करण्याची सेवा आहे. 

प्रशांत भूषण यांनी म्हटले आहे कि, 'काश्मीर मधील बांधवांना भावनिक दृष्ट्या दूर लोटता कामा नये.' त्याची हि भूमिका मला तंतोतंत मान्य आहे. काश्मीर मध्ये राहणारे नागरिक भारतीय नागरिक आहेत याची जन ठेवली पाहिजे. लष्कराच्या आधारे नागरिकांना जोडून ठेवता येत नाही, समता पूर्ण न्याय व्यवहारानेच माणसे एकमेकाशी जोडली जातात. काश्मीर मधल्या हिंदू असो वा शीख वा मुस्लीम या सर्वांशी सर्व भारतीयांनी बंधुभावनेच वागले पाहिजे. जे मुस्लीम धर्माचा द्वेष करतात आणि हिंदुत्ववादाचा पुरस्कार करतात ते भारतीय राष्ट्रवादाचे नुकसान पोहोचवितात. त्यांचे म्हणणे असे आहे कि, काश्मीर मधल्या मुस्लिमांवर लष्कराचे बंधन आवश्यक आहे. जे भारताला निष्टावंत नसतील त्यांना भारतीय लष्कराने पाकिस्तानात पाठवावे किंवा गोळ्या घालून संपवावे. हा तालिबानी जातकुळीचा विचार आहे. तो अनर्थकारी व घातक आहे. आपण हिंदू म्हणून जन्मलो म्हणून भारतीय आहोत असे म्हणता येणार नाही. ५००० वर्षापासून ज्यांची ज्यांची हि जन्म भूमी आहे आणि ज्यांची स्मशानभूमी हीच आहे ते सारे भारतीयाच आहेत. मुस्लिमांना ते भारतीय आहेत किंवा नाहीत हे ठरविण्याचा नैतिक अधिकार कोणालाही नाही.

प्रशांत भूषण यांनी आणखी एक विधान केले आहे. ते म्हणाले कि, ' काश्मीर मधून भारतीय लष्कर काढून घ्यावे. तिथे सार्वमत घ्यावे. त्यांना भारतापासून अलग व्हायचे असेल तर होऊ द्यावे.' या भूमिकेशी मी बिलकुल सहमत नाही. सार्वमत घ्यायचे असेल तर काश्मीर मध्ये प्रत्येक व्यक्ती विवेकशील राहून योग्य मतदान करील असे पाहावे लागेल. त्यासाठी तेथील हिंसा शून्य पातळीवर आली पाहिजे. ज्या प्रमाणे पूर्वी काश्मिरी पंडित व काश्मिरी मुसलमान एका काश्मिरियत या सांस्कृतिक सूत्राने एकत्र बांधले होते. तसे वातावरण तयार झाल्यावर सार्वमत घेण्यात मतलब आहे. पाकिस्तानच्या लष्कराने प्रशिक्षित केलेले धर्मांध अतिरेकी काश्मीर मध्ये पाठवून मोठ्या प्रमाणावर काश्मिरी पंडितांचा व काश्मिरी लोकांचा बळी घेतला आहे. या पाकिस्तानी अतिरेक्याचे छुपे हल्ले चालूच आहेत. अशा परिस्थितीत सार्वमत घेणे गैर होईल. वाघ आणि शेळी यांच्या एकत्र राहण्याबद्दल जर सार्वमत घेतले तर काय परिणाम होईल ? शिवाय सार्वमताचा मुद्दा संयुक्त रास्थ्र संघाने संदर्भ हीन झाला असल्याचे मान्य केले आहे. पाकिस्तानचे लष्कर जो पर्यंत घुसखोरी करीत आहे तो पर्यंत भारतीय लष्कराने काश्मिरी भूमीवर उभे राहण्यात काहीही गैर नाही. या गोष्टी सूर्यप्रकाशा इतक्या स्पष्ट असताना प्रशांत भूषण विपरीत, विचित्र आणि विक्षिप्त भूमिका का घेत असावेत या बद्दल एकाच अंदाज करता येतो. विद्वत्तेच्या आधारे पोकळीमध्ये विद्वान माणसांना साक्षात्कार होतात हा भ्रम त्यांच्या मनात असावा. म्हणून विचारवंतांना झालेले दर्शन एकांगी असण्याची शक्यता असते. ते वैचारिक कसरती करतील पण सत्याला, सत्याच्या सर्व बाजू पाहण्यासाठी सत्याला प्रदिक्षणा घालणार नाहीत. अर्थात त्यांच्या बरोबर तीव्र वैचारिक मतभेत राखूनही त्यांच्यावरच्या शारीरिक हल्ल्याच्या मी त्रिवार निषेध करतो. 

1 comment: