Wednesday 14 December 2011

वैचारिक स्पष्टतेने जुळले धागे




(15-12-2011 : 21:42:18)

दैनिक लोकमत, (सखी पुरवणी) 

जीवनाच्या संध्याकाळी हसत-खेळत एकमेकांशी चर्चा करत, गप्पा मारत आपलं आयुष्य काढावं, एवढीच माफक अपेक्षा ठेवून आम्ही एकमेकांचे जोडीदार व्हायचं ठरवलं. ‘युक्रांद’चे संस्थापक कुमार सप्तर्षी आणि त्यांच्या पत्नी ऊर्मिलाताई सांगताहेत त्यांच्या सहजीवनाच्या प्रवासाविषयी..


‘वैचारिक स्पष्टता असेल, तर नातं अलवार फुलत जातं. जीवनाच्या संध्याकाळी एकमेकांशी चर्चा करत, गप्पा मारत, हसत-खेळत आपलं आयुष्य काढावं, एवढीच माफक अपेक्षा ठेवून आम्ही एकमेकांचे जोडीदार व्हायचं ठरवलं. तेही असंच एके दिवशी गप्पा मारताना. त्या वेळी एका संघटनेत आम्ही एकत्र काम करत होतो. आम्ही दोघंही ‘युक्रांद’चे संस्थापक.


‘लग्न करायचंच आहे, मग ते अनोळखी, कधीही न पाहिलेल्या व्यक्तीबरोबर कसं करणार? तुझ्याशी केलं, तर चालेल मला. बोल, तुला काय वाटतं?’ म्हणत कुमारजींना प्रश्न विचारणार्‍या ऊर्मिलाताई ‘..माझं आयुष्य म्हणजे वादळाशी झुंज आहे. विचार कर,’ असं सांगणार्‍या कुमारजींविषयी बोलत स्वत:च्या संसाराचा पट उलगडत होत्या.


त्या सांगतात, की स्वत:च्या आयुष्याची दिशा स्पष्ट असणारे कुमारजी ‘हो’ म्हणाले तो दिवस होता- २0 मार्च १९६५. प्रत्यक्ष लग्नाची तारीख वेगळी असूनही आम्ही आजही याच दिवशी लग्नाचा वाढदिवस साजरा करतो. हे सांगताना ऊर्मिलाताई मागे मागे थेट ४0-४५ वर्षांपूर्वीच्या त्या दिवसांत जाऊन पोहोचल्या.


तो काळ होता १९६४-६५ चा. ऊर्मिलाताईंच्या घरात गांधीवादी विचारांचा प्रभाव. आई-वडील दोघेही स्वातंत्र्यसैनिक. त्यामुळे घरातील वातावरण चळवळ, विधायक काम करण्यास अनुकूल. ऊर्मिलाताई सांगतात, ‘‘मुलगी म्हणून तुला हे करता येणार नाही, असं माझ्या घरात कधी झालं नाही. मी फग्यरुसन महाविद्यालयात शिकत होते त्याचबरोबर समाजासाठी काही विधायक काम करण्यासाठीच्या ग्रुपमध्येही हिरिरीने भाग घेत होते. ‘मनोहर’ मासिकाने आयोजित केलेल्या एका सर्वेक्षणानंतर पुण्यातील महाविद्यालयांतून ४0-५0 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यांना एकत्र आणून विविध विषयांवर वाद-विवाद, चर्चा यांतून सामाजिक काम करणारी एक टीम उभी राहावी अशी कल्पना. यात ऊर्मिलाताई सहभागी झाल्या होत्या आणि येथेच त्यांची कुमार सप्तर्षी या तरुणाशी ओळख झाली. 


त्या सांगतात, ‘‘त्या वेळी व्यवसायाने डॉक्टर होणारा, जातपात न मानणारा, विविध चळवळी आणि विधायक काम करायचं म्हणजे नक्की काय करायचं, याबाबत वैचारिक स्पष्टता असणारा हा तरुण मला जीवनसाथी म्हणून योग्य वाटला. खेडेगावात जाऊन दवाखाने, रस्ते, आरोग्य, शेतीचे प्रश्न आदि कामांत आम्ही सहभागी होऊ लागलो. त्यापैकी चार ते पाच जणांचा ग्रुप बनला.’’ सारे ऊर्मिलाताईंच्या घरी जमत. चर्चा होत. ऊर्मिलाताई सांगतात, ‘‘आपल्या वाक्चातुर्याने सर्वांची मने जिंकणार्‍या कुमारने आमच्या घरातल्यांचे विशेषत: माझ्या आईचे मन कधीच जिंकले होते; पण आंतरजातीय विवाह असल्याने कुमारजींच्या घरून लग्नाला विरोध झाला. त्या वेळी गाजावाजा व कोणतीही उधळपट्टी न करता म्हणजे १0 मे १९६९ मध्ये आम्ही रजिस्टर पद्धतीने लग्न केले. घरी गेलो, आशीर्वाद घेतला. सुखी राहा म्हणत घरच्यांनी निरोप दिला. लग्न केले त्याच रात्री घराचा प्रश्न निर्माण झाला. त्या रात्री मित्राकडे राहिलो. एकमेकांना पूर्णपणे वैचारिक आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य देत छोटेखानी जागेत आमचा स्वतंत्र संसार सुरू झाला.’’ 


कुमारजी सांगतात, लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी आम्ही एस. एम. जोशी यांना कल्पना दिली होती. त्यांनी सांगितले, की तू डॉक्टर आहेस. स्वत:च्या पैशातून तुम्हा दोघांना पुरेसे होईल असे घर घे. नंतर खुशाल समाजकार्यासाठी स्वत:ला वाहून घे. सुरुवातीला भाड्याच्या जागेत एकाच ठिकाणी पार्टिशन करून घर आणि दवाखाना सुरू केला. प्रॅक्टिस जोरात सुरू होती; पण मन समाज आणि विधायक कामांकडे धाव घेत होते. जे गरजेचं नाही ते घ्यायचं नाही, याबाबत आम्हा दोघांमध्ये एकमत होतं. अखेरीस त्याकाळी ४0 हजार रुपये किमतीचं स्वत:चं घर घेतलं. ते ऊर्मिलाच्या नावे केलं. त्यानंतर मी समाजकार्यासाठी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून वाहून घेतलं. ‘उंबर्‍याच्या बाहेरचा पैसा घरात आणायचा नाही आणि घरातील पैसा बाहेर न्यायचा नाही,’ या विचाराशी पक्के राहून काम केले. 


मी एम.एस्सी., एल.एल.बी., पीएच.डी.(टिश्यू कल्चर) आहे. तेव्हा मी नोकरी करत होते. ‘रांधा, वाढा, उष्टी काढा’ यापुरती मी कधीच र्मयादित राहिले नाही. कुमारजींनीही, ‘तुला ठरवायचंय मूल कधी होऊ द्यायचंय ते ठरवं असं सांगून मला मातृत्वाचं स्वातंत्र्य दिलं. लग्नानंतर दहा वर्षांनी मी आई होण्याचा निर्णय घेतला. मुलाला वाढवतानाही आम्ही निकोप दृष्टिकोन ठेवला. त्याला त्याच्या वयाच्या १८व्या वर्षी जात-धर्म स्वीकारण्याचं स्वातंत्र्य दिलं. 


युथ ऑर्गनायझेशन, ‘युक्रांद’ची स्थापना, त्यानंतर आमदार, सत्याग्रही मासिकाचा संपादक, ग्रामीण भागातील शिक्षण संस्थेचा प्रमुख, वक्ता, लेखक अशा विविध टप्प्यांवर प्रवास सुरू होता. या काळात अनेक वेळा संघर्षमय परिस्थिती निर्माण झाली. घरावर हल्लेही झाले; पण नेहमीच एकमेकांचा आदर जपल्याने आणि वैचारिक बैठक पक्की असल्याने सहजीवनाचा प्रवास आनंदमय झाला आहे. - उर्मिलाताई सांगतात.


- पल्लवी धामणे-रेखी

Saturday 10 December 2011

भारत महान देश आहे!


संसदीय लोकशाहीची वैशिष्ठे समजून घेणे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. लोकशाही प्रणालीत दुसर्याला वैरी मानणे, दुसर्याचा सन्मान ना कबूल करणे, धमक्या, शिवीगाळ, आक्रमक भाषा या गोष्टी वर्ज असतात. मानवी विकासाचा वा मानवाच्या संस्कृतीच्या उत्क्रांतीमध्ये सर्वाधिक उत्क्रांत झालेली राजकीय प्रणाली म्हणजे लोकशाही! भविष्यात लोकशाही पेक्षाही अधिक सुसंस्कृत व उन्नत राजकीय प्रणाली उदयाला येवू शकेल पण आज मात्र लोकशाही हीच केवळ उन्नत प्रणाली आहे. लोकशाही व्यवस्था कितीही बिघडली तरी तिला उपचार म्हणून लोकशाहीचाच अधिक डोस द्यावा लागतो. उदा. पं. इंदिरा गांधी यांनी देशातली लोकशाही रद्दबातल केली होती, परंतु ५ लाख लोकांनी सत्याग्रह करून कारावास भोगला, क्लेश सहन करून जनतेला लोकशाहीचे महत्व पटवून दिले त्यामुळे १९७७ साली लोकशाहीची पुन्हा स्थापना झाली. हुकुमशाहीच्या प्रणालीत असे घडत नाही. हुकुमशाही घालविण्यासाठी रक्तपात करणे अपरिहार्य असते. हुकुमशाहीचा अंत हुमुंशाहाचा अंत झाला तरच होतो. लोकशाहीची गम्मत हि आहे कि, इंदिरा गांधीच्या विरोधकांनी तिच्यावर हिंसक हल्ला केला नाही आणि इंदिरा गांधींनी देखील सत्ता सोडताना हिंसाचाराचा मार्ग अवलंबला नाही. विरोधकांना गोळ्या घातल्या नाहीत. हि लोकशाहीच्या सभ्यतेची कीर्ती आहे. जगातल्या प्रत्येक हुकुमाशाहाचा मृत्यू झाल्यानंतरच हुकुमशाहीचा अंत झाला आहे.

जो कोणी अन्य लोकांचा सन्मान मनोमनी कबूल करतो, तोच लोकशाही मध्ये सन्मानास पात्र होतो. आण्णा हजारे अन्य कोणाचाच सन्मान काबुल करीत नाहीत. प्रत्येक विरोधकाला वैरी मानतात, स्वतःच्या काम्पुमधील गुंड व भ्रष्ट प्रवृत्तीच्या लोकांवर पांघरून घालतात. मी त्यांचा मान ठेवून त्यांनी या दोषातून मुक्त व्यावे अशी त्यांना विनंती करतो. त्यांनी आक्रोश करून देशामध्ये वैरात्वाचे वातावरण वाढवू नये. त्यांना भ्रष्टाचाराचे निर्मुलन करायचे आहे कि कोणाच्या वतीने कोणाला गारद करायचे आहे कि काय अशी शंका येते. अण्णा हजारे यांचा मी मन: पूर्वक सन्मान करतो; पण  त्यांच्या चुका दाखविण्यात मी कचरलो तर तो माझा दोष असेल असे मला वाटते. लोकशाही मध्ये सर्वांना अभय वाटले पाहिजे. 

लोकपाल बिल लोकसभेत येणारच नाही असा आक्रोश चालू होता. पण ते बिल संसदेमध्ये मांडण्यात आले आहे. आता भाजप सारख्या विरोधी पक्षाने आपल्या बौद्धिक कौशल्याने सभागृहाला पटवून त्या कायद्याला आकार द्यायचा आहे. पण ते जबाबदारीपासून पलायन करीत आहेत. संसदेवर रोज बहिष्कार टाकल्याने भाजप लोकप्रिय होत आहे असे मानण्याचे कारण नाही. 

जुन्या जमान्यात 'सिकंदर दि ग्रेट' असा एक विक्प्रचार होता. सध्या 'अण्णा दि ग्रेट' असा वाक्प्रचार रुजू लागला आहे. अण्णांच्या मागे भाजप जय्यत तयारीनिशी उभा आहे. व्यापारी वर्गांच्या हातातला अण्णा हा 'थ्रो बॉल' आहे. त्यासाठी व्यापारी वर्ग कितीही पैसा खर्च करायला तयार आहे. फक्त त्यांना भेसळ, मापात गडबड, शेतकऱ्यांचे दलालांमार्फत शोषण आणि ग्राहकांची फसवणूक या बाबतीत अण्णांनी वरदान दिले पाहिजे. अण्णांनी म. गांधीना सोडले आणि शिवाजी महाराजांना पकडले तर ते मराठ्यांपेक्षा ब्राह्मणांमध्ये अधिक प्रिय होतील. कारण ते आपली लढाई शिवाजी महाराजांच्या आडूनच करीत असतात. शिवाजी महाराज आणि म. गांधी आपापल्या काळातले महापुरुष आहेत. अण्णांच्या बोलण्यामुळे संभ्रम निर्माण होत आहे. म. गांधी आणि शिवाजी महाराज एकाच काळाची अपत्ये आहेत असे वाटू लागते. काळाचे संधर्भ महत्वाचे असतात. रा, स्व. संघाचे लोक म्हणतात कि "शिवाजी महाराज विचार - विनिमय अश्या भानगडीत पडत नसत. ते सरळ शाहिस्तेखानची बोटे कापत आणि अफजल खानाचा कोथळा बाहेर काढत." संघाला भूतकाळ वर्तमान काळावर लादायचा आहे. नथुराम गोडसेचा हिंसाचार आणि नरेंद्र मोदीचा नरसंहार याचे समर्थन करायचे आहे. अण्णा शिवाजीचे अवतार आहेत हा भ्रम पसरविल्या नंतर मराठा समाज हिंदुत्ववादी होण्याची शक्यता वाढते. आणि मराठा समाज हिंदुत्ववादी होणे म्हणजे ब्राह्मणांचे वर्चस्व मान्य करणे आहे. म्हणूनच अण्णा ब्राह्मण प्रिय होत आहेत आणि ते गो ब्राह्मण प्रतिपालक आहेत असा गोड गैरसमज ब्राह्मणांनी करून घेतला आहे. पण आता शिवाजी महाराजांवर संसदीय लोकशाही आणि म. गांधीचे विचार याचा परिणाम होवून त्यांनी त्या काळात तसे वर्तन केले असते असा विचार हे बालबुद्धीचे लक्षण आहे. याचा अर्थ शिवाजी महाराजांनी संसदेमध्ये शाहिस्तेखान व अफजल खान यांच्या विरोधात अगदी जन लोकपाल बिलाच्या शैलीत कायदा संमत केला असे म्हनाण्याचेही लोक धाडस करतील. त्याचप्रमाणे म. गांधी तालावर घेवून, घोड्यावर बसून ब्रिटीश राज्यकर्ते अंधारात, गाढ निद्रेत असतात गांधी सपासप वार करीत आहेत. आणि ब्रिटीश जागे होण्याच्या आधी निघून जात आहेत असेही संघवाले उद्या सांगू शकतील. त्यांच्या व अण्णांच्या दुर्दैवाने अनंत लोक बाल बुद्धीचे नाहीत म्हणूनच म्हणायचे आहे कि, भारत महान देश आहे!