Wednesday 16 November 2011

सामर्थ्य आहे चळवळीचे.....



उसाच्या भाव वाढीचे आंदोलन 

राजू शेट्टी यांनी बारामती हे मुख्य केंद्र करून सहकारी साखर कारखान्यांकडून उसाचे भाव वाढून मिळावेत यासाठी आंदोलन केले. याला माझा व युक्रांद चा पाठींबा होता. मी ११ नोव्हेंबर रोजी बरोबर दुपारी १२ वाजता बारामतीला पोहचलो. ज्या काही चार गोष्टी सांगाव्यात असे वाटत होत्या त्या राजू शेट्टी यांना सांगितल्या. तीन वाजता तिथून परत निघालो. संध्याकाळी सरकारने वाढीव दर जाहीर केले आणि राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली. सर्व शेतकरी व त्यांचे नेते राजू शेट्टी यांचे अभिनंदन!

अण्णा हजारे व राजू शेट्टी यांच्या आंदोलनाचे जवळून निरीक्षण करताना व आकलन करताना काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या. चळवळ, जन आंदोलन, सत्याग्रही जन आंदोलन, राडेबाजी आंदोलन या सर्व गोष्टींच्या संकल्पना परस्परात मिसळून त्या शब्दांचे मूळ अर्थ बदलले आहेत. विशेषता अण्णा हजारे, केजरीवाल, किरण बेदी यांच्या वेगवेगळ्या वेळी प्रसिद्ध झालेल्या उक्तींमुळे आंदोलन, जन आंदोलन व सत्याग्रह या मूळ शब्दांचे अर्थ पार बदलून गेले आहे. परंतु या प्रत्येक गोष्टीचे वेगळेपण काय ते तरुणांनी जाणून घेणे आवश्यक आहे.

राजू शेट्टी यांचे आंदोलन हे एका विशिष्ट वर्गाचे आर्थिक आंदोलन होते; पण ते जन आंदोलन नव्हते. जन आंदोलनाचे हे विशेष असते कि त्यात समाजातील सर्व वर्ग, जाती व विविध धर्माचे अनुयायी सामील असतात, थोडक्यात जन आंदोलन बहुआयामी असते. ते राष्ट्र बांधणीला पुष्टी देणारे असते. हे आंदोलन शेतकरी वर्गाचे प्रस्थापित सत्ताधारी वर्गाच्या विरुद्ध वर्ग संघर्ष या स्वरूपातले होते. त्याचे युक्रांद स्वागत करते. 

त्याची कारणे पुढील प्रमाणे:
०१. हे आंदोलन पूर्णपणे अहिंसक होते. 
०२. राजू शेट्टी यांचे नेतृत्व 
०३. शेतकऱ्यांची एकजूट 

या आंदोलनाने ग्रामीण भाग ढवळून निघाला. ग्रामीण भागात या विचार मंथनाची गरज आहे. ग्रामीण भागातून आलेले पुढारीच शेतकऱ्यांचे शोषण करतात, ते अधिक ठसठसीतपणे कळले त्यातच देशाचे हित सामावलेले आहे. प्रस्थापित नेते नव भांडवलशाहीचे दलाल असल्याने 'आपण शेतकऱ्यांची मुले आहोत' हेच ते विसरून जातात. त्यांना भांडवलदारांच्या दलालीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी लुटायला आवडते. भांडवलदारांना शेती नकोय, शेतकरी नको आहे. त्यांना फक्त जमीन दिसते. शेतकऱ्यांच्या मालाला जेन्वा योग्य भाव मिळतील तेन्वाच शेती टिकेल. जर योग्य भाव मिळाला नाही तर शेतकरी शेती करणार नाही, शेती टिकणार नाही, अन्नाकरिता भारत परावलम्बी होइल.

भावी काळात दोन राष्ट्रांच्या संघर्षात शाशत्रांच्या वापरा ऐवजी भुके मारण्याचे शास्त्र वापरले जाईल. भारताला महासत्ता होण्याचे स्वप्न पडले आहे. परंतु देश जर स्वत: च्या जनतेसाठी पुरेसे अन्न तयार करू शकला नाही तर त्याला हे स्वप्न पाहण्याचा अधिकार नाही. म्हणून जे जे शेती व शेतकरी यांना समृद्ध करील त्याला युक्रांचा पाठींबा राहील. 

राजू शेट्टी या नेत्याचा त्याग, साधेपणा व प्रामाणिकपणा पाहून त्याच्या नेतृत्वाखाली सर्व शेतकरी एकत्र आले. राजू कुशल संघटक आहे. त्यामुळे तो त्याच्या क्षेत्रातून बाहेर पडला आणि शरद पवारांच्या गुहेत शिरून आह्वान दिले. ज्याला आपल्या क्षेत्रामध्ये सघन काम करता करता विस्तारित होता येते त्या नेत्याचा भविष्यकाळ उज्वल असतो. बारामतीत येवून ठिय्या मांडून बसण्याची त्याची खेळी राजकीय दृष्ट्या अत्यंत प्रभावी होती. राजूने उपवास केला नसते तरी चालले असते. त्याच्या उपवासाने आंदोलनाला विशेष धार आली असे म्हणता येणार नाही. गरज नसताना उपोषण करण्याचे कारण अण्णा हजारे यांचा परिणाम असे दिसते. परंतु हा प्रकार रुजला तर मराठीतील एक म्हण बदलावी लागेल. आज पर्यंत म्हटले जाई कि, 'सामर्थ्य आहे चळवळीचे! जो जो करील तयाचे !' परंतु आता लोक म्हणतील कि. 'सामर्थ्य आहे उपवासाचे! जो जो उपाशी राहील तयाचे!'  सामुदाईक पुरुषार्थ नामक संकल्पनेला काजळी आणणारे हे सूत्र आहे.

अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सारे काही व्यक्ती केंद्रित आहे. टीम - अण्णा हा शब्द केवळ भ्रम मूलक आहे. ज्या प्रमाणे कडू साखर अस्तित्वात नसते तशी काल टीम  अण्णा नव्हती - आज नसणार आणि उद्याही नसणार! अण्णा, अण्णा आहेत. अण्णांची टीम असा प्रकार अस्तित्वात असूच शकत नाही. अण्णा आता ५० लोकांची टीम करणार आहेत. त्या नंतर सारे काही बैजवार होणार असा प्रचार चालू आहे. हे पन्नास लोक कुठून येणार ? कोण निवडणार ? त्यासाठी अण्णांनी अर्ज मागविले आहेत. उद्या अण्णांकडून ज्ञान मिळाल्यामुळे भारतीय क्रांतीसाठी अर्ज मागविण्याचा विचार करीत आहोत. अडचण एकच आहे. रामलीला आंदोलनाला २५० कोटी खर्च आला असे म्हणतात तर क्रांतीसाठी आम्हाला निदान २५ हजार कोटींचा प्रायोजक मिळवावा लागेल. भांडवलदारांच्या मदतीने समाजवादी क्रांती करण्याचा मानस कसा पूर्ण करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी युक्रांदची एक टीम राळेगणला रवाना झाली आहे. 

1 comment:

  1. Doctor. your article is excellent and to the point. I do not agree with you on point that this agitation was non violent. It was violent. Is Rasta Roko , burning, stone pelting not violent?

    ReplyDelete