Wednesday 28 November 2012

बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतरची सेना


सप्रेम नमस्कार!


बरेच दिवस, नव्हे काही महिने मी ऑफलाईन होतो. कारण परदेशात गेलो होतो. त्याच्या आधी सत्याग्रहीचा दिवाळी अंक आणि गांधी स्मारक निधीतर्फे साजरा होणारा गांधी सप्ताह वगैरे गडबडीत होतो. मधल्या काळात सर्वात मोठी व दखलपात्र घटना म्हणजे शिवसेनेचे सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे निधन. ही दुर्देवी व भावनात्मक घटना असली तरी त्यांचे मरण नैसर्गिक होते ही गोष्ट लक्षात घेतली पाहीजे. त्याच्या नंतर शिवसेना वाटचाल कशी करणार हा महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्या मोठा प्रश्न आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला शिवसेनेतील इलेक्टीव मेरीट असलेले युवक आपल्यामध्ये सामावून घ्यावेत अशी स्वाभाविक इच्छा दिसते. कारण बाळासाहेब ठाकरे यांना श्रध्दांजली वाहणा-या संपूर्ण पानाच्या महागडया जाहिराती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने दिल्या आहेत. वृत्तपत्रांबरोबरच दुरचित्रवाहिन्यांवर श्रध्दांजली आणि ज्यांनी जाहिरात दिली त्यांची नावे यांचे सर्वेक्षण केल्यास पुन्हा याच पक्षाचे नाव घ्यावे लागते. परंतु प्रश्न वाटतो तेवढा सोपा नाही. शिवसेनेचे स्थानिक नेते राष्ट्रवादीमध्ये जाण्यापूर्वी प्रथेप्रमाण आधी तिकीट व नंतर पक्षप्रवेश या तत्वाचा अंगिकार करतील. दोन्ही कॉंग्रेस पक्षांची आघाडी असल्याने राष्ट्रवादीला आपल्या कोटयातूनच शिवसेनेच्या लोकांना उमेदवा-या द्याव्या लागतील. त्यामुळे कदाचित राष्ट्रवादीचे लोक शिवसेनेत जातील. म्हणजे राजकारणात कुणी कुणाला गिळून टाकू शकणार नाही. 

दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे मनसे आणि शिवसेना यांचे एकत्रिकरण होईल काय? या प्रश्नाबद्‌दल जे विचार सध्या व्यक्त केले जात आहेत. त्यात भाबडेपणा अधिक दिसतो. एक लक्षात घेतले पाहिजे की, बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत राज ठाकरे यांनी फारकत घेतली होती. वास्तविक बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वारस राज ठाकरे हेच होते. परंतु त्यांनी विद्यार्थी सेनेपासून सवतासुभा निर्माण केला होता. सवता सुभा याचाच अर्थ असा की, त्यांनी त्यांचे निष्ठावंत हनुमान गोळा केले होते. त्यांची निष्ठा शिवसेनेत गेल्यांनतर बदलणे शक्य नाही. त्यामुळे एकत्रिकरणात दोन प्रवाह कायम अलग राहतील. अर्थात नद्या वेगळया असल्या तरी एखाद्या उतारावर त्यांचा संगम होतो. परंतु समांतर अंतर ठेवून वाहणा-या दोन प्रवाहांचा संगम सहसा लवकर होत नाही. समाजवादी फुटले, कम्युनिष्ट फुटले, कॉंग्रेस फुटली; त्यानंतर पुन्हा प्रवाह एकत्र आले नाहीत. आणिबानी नंतर कॉंग्रेस फुटली आणि इंदिरा कॉंग्रेस नावाचा नवा पक्ष उदयाला आला. तो जुन्या कॉंग्रेस पक्षापेक्षा वेगळया राजकीय चारित्रयाचा पक्ष आहे. डावे व उजवे कम्युनिष्ट पक्ष एकत्र आले नाहीत. तसेच प्रजासमाजवादी व संयुक्त समाजवादी फुटल्यानंतर एकत्र आले नाहीत. रिपब्लिकन पक्षाचे 25 - 30 तुकडे झाले. ते एकत्र आले नाहीत. मनसे मध्ये शिवसेना विलय पावू शकत नाही. कारण एकच! नदी समुद्राला मिळते, पण समुद्र कधी नदीत शिरत नाही. याचा अर्थ एकत्रीकरणासाठी मनसेला शिवसेनेमध्ये विलीन व्हावे लागेल. याला राज ठाकरे तयार होतील असे वाटत नाही. आगामी निवडणूकीत मनसे व भाजपा यांची युती होण्याची शक्यता अधिक आहे. अशा वेळी सोनिया कॉंग्रेस व शिवसेना उघड वा छुप्या रितीने समझोता करतील ही शक्यता अधिक आहे. कारण ऍन्टी कॉंग्रेसीझमचा काळ संपुष्टात आला आहे. 

शिवसेनेने नवीन कार्यप्रणाली स्वीकारली व आपले राजकीय चारित्रय बदलले तर तो पक्ष महाराष्टा्रतील एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आकाराला येवू शकतो. त्यांच्यामध्ये ही सुप्त शक्ती आहे. त्यासाठी उध्दव ठाकरे यांना आदेश काढून शिवसेनेत लोकशाही आणावी लागेल. हे विधान प्रथमदर्शनी विचित्र वाटेल, पण जबाबदार विरोधीपक्ष व्हायचे असेल तर अंतर्गत लोकशाही आणि कायद्याच्या राज्याला बांधीलकी मानावीच लागते. काही काळ तरी शिवसेनीकांच्या बौध्दीक सवयीनुसार त्यांच्यामधील बदल आदेशानेच घडवून आणावे लागतील. तेवढी प्रगल्भता उध्दव ठाकरे दाखवू शकतात यावर माझा विश्वास आहे. याला कारण आहे. मनोहर जोशी शिवसेेनेतर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, परंतु त्यांनी एखाद्या गल्लीतल्या शाखाप्रमुखाप्रमाणे थिल्लरपणा दाखविला. स्वत:च्या मालकीची जागा वाचविण्यासाठी ते म्हणाले की, ‘कायद्याने शिवाजीपार्कवर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात आले तर ठीकच, अन्यथा शिवसैनिक कायदा हातात घेवून स्मारक उभारतील’. मनोहर जोशी हे कधीतरी मुख्यमंत्री होते असे म्हणण्याचे धाडस कुणी करणार नाही असे त्यांचे वक्तव्य आहे. पण उध्दव ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्यासह सर्वांनाच संयम राखण्याचा आदेश दिला. यावरून हे सिध्द होते की, उध्दव ठाकरे प्रगल्भ आहेत. 

No comments:

Post a Comment