Wednesday, 14 December 2011

वैचारिक स्पष्टतेने जुळले धागे




(15-12-2011 : 21:42:18)

दैनिक लोकमत, (सखी पुरवणी) 

जीवनाच्या संध्याकाळी हसत-खेळत एकमेकांशी चर्चा करत, गप्पा मारत आपलं आयुष्य काढावं, एवढीच माफक अपेक्षा ठेवून आम्ही एकमेकांचे जोडीदार व्हायचं ठरवलं. ‘युक्रांद’चे संस्थापक कुमार सप्तर्षी आणि त्यांच्या पत्नी ऊर्मिलाताई सांगताहेत त्यांच्या सहजीवनाच्या प्रवासाविषयी..


‘वैचारिक स्पष्टता असेल, तर नातं अलवार फुलत जातं. जीवनाच्या संध्याकाळी एकमेकांशी चर्चा करत, गप्पा मारत, हसत-खेळत आपलं आयुष्य काढावं, एवढीच माफक अपेक्षा ठेवून आम्ही एकमेकांचे जोडीदार व्हायचं ठरवलं. तेही असंच एके दिवशी गप्पा मारताना. त्या वेळी एका संघटनेत आम्ही एकत्र काम करत होतो. आम्ही दोघंही ‘युक्रांद’चे संस्थापक.


‘लग्न करायचंच आहे, मग ते अनोळखी, कधीही न पाहिलेल्या व्यक्तीबरोबर कसं करणार? तुझ्याशी केलं, तर चालेल मला. बोल, तुला काय वाटतं?’ म्हणत कुमारजींना प्रश्न विचारणार्‍या ऊर्मिलाताई ‘..माझं आयुष्य म्हणजे वादळाशी झुंज आहे. विचार कर,’ असं सांगणार्‍या कुमारजींविषयी बोलत स्वत:च्या संसाराचा पट उलगडत होत्या.


त्या सांगतात, की स्वत:च्या आयुष्याची दिशा स्पष्ट असणारे कुमारजी ‘हो’ म्हणाले तो दिवस होता- २0 मार्च १९६५. प्रत्यक्ष लग्नाची तारीख वेगळी असूनही आम्ही आजही याच दिवशी लग्नाचा वाढदिवस साजरा करतो. हे सांगताना ऊर्मिलाताई मागे मागे थेट ४0-४५ वर्षांपूर्वीच्या त्या दिवसांत जाऊन पोहोचल्या.


तो काळ होता १९६४-६५ चा. ऊर्मिलाताईंच्या घरात गांधीवादी विचारांचा प्रभाव. आई-वडील दोघेही स्वातंत्र्यसैनिक. त्यामुळे घरातील वातावरण चळवळ, विधायक काम करण्यास अनुकूल. ऊर्मिलाताई सांगतात, ‘‘मुलगी म्हणून तुला हे करता येणार नाही, असं माझ्या घरात कधी झालं नाही. मी फग्यरुसन महाविद्यालयात शिकत होते त्याचबरोबर समाजासाठी काही विधायक काम करण्यासाठीच्या ग्रुपमध्येही हिरिरीने भाग घेत होते. ‘मनोहर’ मासिकाने आयोजित केलेल्या एका सर्वेक्षणानंतर पुण्यातील महाविद्यालयांतून ४0-५0 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यांना एकत्र आणून विविध विषयांवर वाद-विवाद, चर्चा यांतून सामाजिक काम करणारी एक टीम उभी राहावी अशी कल्पना. यात ऊर्मिलाताई सहभागी झाल्या होत्या आणि येथेच त्यांची कुमार सप्तर्षी या तरुणाशी ओळख झाली. 


त्या सांगतात, ‘‘त्या वेळी व्यवसायाने डॉक्टर होणारा, जातपात न मानणारा, विविध चळवळी आणि विधायक काम करायचं म्हणजे नक्की काय करायचं, याबाबत वैचारिक स्पष्टता असणारा हा तरुण मला जीवनसाथी म्हणून योग्य वाटला. खेडेगावात जाऊन दवाखाने, रस्ते, आरोग्य, शेतीचे प्रश्न आदि कामांत आम्ही सहभागी होऊ लागलो. त्यापैकी चार ते पाच जणांचा ग्रुप बनला.’’ सारे ऊर्मिलाताईंच्या घरी जमत. चर्चा होत. ऊर्मिलाताई सांगतात, ‘‘आपल्या वाक्चातुर्याने सर्वांची मने जिंकणार्‍या कुमारने आमच्या घरातल्यांचे विशेषत: माझ्या आईचे मन कधीच जिंकले होते; पण आंतरजातीय विवाह असल्याने कुमारजींच्या घरून लग्नाला विरोध झाला. त्या वेळी गाजावाजा व कोणतीही उधळपट्टी न करता म्हणजे १0 मे १९६९ मध्ये आम्ही रजिस्टर पद्धतीने लग्न केले. घरी गेलो, आशीर्वाद घेतला. सुखी राहा म्हणत घरच्यांनी निरोप दिला. लग्न केले त्याच रात्री घराचा प्रश्न निर्माण झाला. त्या रात्री मित्राकडे राहिलो. एकमेकांना पूर्णपणे वैचारिक आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य देत छोटेखानी जागेत आमचा स्वतंत्र संसार सुरू झाला.’’ 


कुमारजी सांगतात, लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी आम्ही एस. एम. जोशी यांना कल्पना दिली होती. त्यांनी सांगितले, की तू डॉक्टर आहेस. स्वत:च्या पैशातून तुम्हा दोघांना पुरेसे होईल असे घर घे. नंतर खुशाल समाजकार्यासाठी स्वत:ला वाहून घे. सुरुवातीला भाड्याच्या जागेत एकाच ठिकाणी पार्टिशन करून घर आणि दवाखाना सुरू केला. प्रॅक्टिस जोरात सुरू होती; पण मन समाज आणि विधायक कामांकडे धाव घेत होते. जे गरजेचं नाही ते घ्यायचं नाही, याबाबत आम्हा दोघांमध्ये एकमत होतं. अखेरीस त्याकाळी ४0 हजार रुपये किमतीचं स्वत:चं घर घेतलं. ते ऊर्मिलाच्या नावे केलं. त्यानंतर मी समाजकार्यासाठी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून वाहून घेतलं. ‘उंबर्‍याच्या बाहेरचा पैसा घरात आणायचा नाही आणि घरातील पैसा बाहेर न्यायचा नाही,’ या विचाराशी पक्के राहून काम केले. 


मी एम.एस्सी., एल.एल.बी., पीएच.डी.(टिश्यू कल्चर) आहे. तेव्हा मी नोकरी करत होते. ‘रांधा, वाढा, उष्टी काढा’ यापुरती मी कधीच र्मयादित राहिले नाही. कुमारजींनीही, ‘तुला ठरवायचंय मूल कधी होऊ द्यायचंय ते ठरवं असं सांगून मला मातृत्वाचं स्वातंत्र्य दिलं. लग्नानंतर दहा वर्षांनी मी आई होण्याचा निर्णय घेतला. मुलाला वाढवतानाही आम्ही निकोप दृष्टिकोन ठेवला. त्याला त्याच्या वयाच्या १८व्या वर्षी जात-धर्म स्वीकारण्याचं स्वातंत्र्य दिलं. 


युथ ऑर्गनायझेशन, ‘युक्रांद’ची स्थापना, त्यानंतर आमदार, सत्याग्रही मासिकाचा संपादक, ग्रामीण भागातील शिक्षण संस्थेचा प्रमुख, वक्ता, लेखक अशा विविध टप्प्यांवर प्रवास सुरू होता. या काळात अनेक वेळा संघर्षमय परिस्थिती निर्माण झाली. घरावर हल्लेही झाले; पण नेहमीच एकमेकांचा आदर जपल्याने आणि वैचारिक बैठक पक्की असल्याने सहजीवनाचा प्रवास आनंदमय झाला आहे. - उर्मिलाताई सांगतात.


- पल्लवी धामणे-रेखी

1 comment:

  1. I want to know about Dr Kumar Saptrshi's role in Rahuri Krishi Vidyapeeth's (Mahatma Phule Agri University) incident related to malfunctions in admission. Dr Saptarshi registered protest and agitation during the period...may be some where between 1975-78....

    DR Anand Sawant, 9028466507

    ReplyDelete